उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कोरोनाची दुसरी लाट ही सर्वात घातकी ठरत असुन पहिल्या लाटेच्या तुलनेत याला कोरोनाचा त्सुनामी म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मार्च महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या लाटेची चाहूल रुग्ण संख्या वाढत चालल्याने लागली होती मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाने कहर करीत अनेकांना बाधीत केले तर 274 पेक्षा अधिक रुग्णांचा बळी घेत अक्षरशः मृत्यूच तांडव घातले, नातेवाईकांच्या आक्रोशाने स्मशानभूमीही काही काळ गहिवरली. एकाच वेळी 20 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची तर अंत्यसंस्कारसाठी जागा नसल्याने वाट पाहायची दुर्दैवी वेळ आली. कोरोनाचे मागील संपूर्ण वर्षाचा आकडा एकीकडे तर दुसरीकडे एकटा एप्रिल महिनाचे आजवरचे 26 दिवस सर्वांसाठी घातकी ठरले आहेत. एप्रिल 2021 च्या 26 तारखेपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात 14 हजार 530 रुग्ण सापडले तर 274 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला ( यात सारीने मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश नाही ) उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 26 दिवसात सरासरी दररोज 558 रुग्ण सापडले तर दररोज सरासरी 10 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची मागील 13 महिन्याची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर एप्रिल महिना प्रशासन व आरोग्य यंत्रणेसाठी परीक्षेचा व संयमाचा काळ ठरला.

उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल 2020 महिन्यात कोरोनाचे 3 रुग्ण सापडले त्यानंतर मार्च 2021 या एक वर्षाच्या काळात 20 हजार 535 रुग्ण सापडले तर 596 जणांचा कोरोनाने बळी घेतला मात्र एप्रिल 21 या महिन्याच्या 26 दिवसात तब्बल 14 हजार 530 रुग्ण सापडले तर 274 जणांचा कोरोनाने बळी घेतला त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक घातक ठरली आहे. जिल्हयात कोरोनाचे आजवर 35 हजार 65 रुग्ण सापडले असून त्यापैकी एकट्या एप्रिल महिन्यात 14  हजार 530 म्हणजे आजवरच्या एकूण रुग्णाच्या 41.30 टक्के रुग्ण हे या 26 दिवसात सापडले असून अजून एप्रिल महिना संपायला 4 दिवस बाकी आहेत. एकाच महिन्यात इतके रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेवर व प्रशासनावर ताण आला मात्र त्यांनी उपलब्ध साधन सामुग्री व मनुष्यबळावर उपचार केले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 869 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. मे 2020 या महिन्यात कोरोनाने 2 रुग्णांचा बळी घेतला त्यानंतर 1 वर्षात मार्च 2021 अखेर 596 जण मयत झाले मात्र एप्रिल 2021 मध्ये आजवर 26 दिवसात 274 जणांचा मृत्यू झाला म्हणजे आजवरच्या एकूण मृत्यूच्या तुलनेत 31.53 टक्के मृत्यू हे एप्रिलमध्ये झाले , याच एप्रिल महिन्यात जवळपास 15 ते 20 मृत्यू हे सारीने झाले ते मृत्यू कोरोनाच्या मृत आकडेवारीत समाविष्ट केलेले नाहीत. एक वेळ अशी होती की जानेवारी महिन्यात एकही मृत्यू नव्हता तर डिसेंबर 20 ते मार्च 21 या 4 महिन्यात एकूण 25 मृत्यू होते तर दुसरीकडे 16 व 21 एप्रिलला एकाच दिवशी प्रत्येकी 23 जणांचा बळी गेला. सारी व कोरोनाने झालेल्या मृत्यूने हाहाकार उडाला तर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी जागा कमी पडली, आपल्या कुटुंबातील मयत सदस्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईकांनी मिळेल तिथे जागा शोधली हा क्षण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला.


 
Top