उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे यंदा सरकारने पुन्हा वाढविलेल्या चाचण्या, वाढत असलेला संसर्ग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाउन आणि कडक निर्बंधामुळे केशकर्तनालये बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले. त्यामुळे ज्या व्यवसायावर कुटुंबाची उपजीविका होती, तो व्यवसायच बंद झाल्याने चिंताग्रस्त तरूण केशकर्तनालय दुकान मालकाने विष घेवून आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात सरकारने सलून दुकाने बंद केल्यामुळे हतबल होवून आपण आत्महत्या करीत असल्याचे नमुद केले आहे. यावरून कडक निर्बंधांचा छोट्या व्यावसायिकांवरील संकटांची गांभीर्यता समोर आली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील सांजा गावातील मनोज झेंडे या नाभिक समाज बांधवाचे केशकर्तनालयाचे दुकान होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने रोजच्या व्यवसायावर कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र सरकारने अचानकपणे चहाची दुकाने, पानटपर्‍या आणि केशकर्तनालयाची दुकाने बंद करण्याचे आदेश जारी केले. दरम्यान गतवर्षी घरातील एका मुलीचे लग्न केल्याने खासगी देणे झेंडे कुटुंबावर झाले आहे. परंतु आता दुकानेच बंद झाल्याने नैराश्याचे जीवन जगत असलेल्या मनोज झेंडे या तरूणाने कुटुंबाची उपजिवीका भागत नसल्याने व आर्थिक देणे झाल्याने चिठ्ठी लिहून ठेवून विष पिऊन आत्महत्या केली.

मयत मनोज झेंडे यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या मुलीचे गतवर्षी लग्न झाले आहे. दररोज आपल्या व्यवसायातून होणार्‍या तुटपुंज्या कमाईवर घरप्रपंच सुरू असायचा. कोरोना आला अन् सर्व काही बघडत गेले. मागचे वर्षही असेच गेले. आता कुठे व्यवस्था सुरळीत होत होती. मात्र राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनेत छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या समस्यांचा विचार न करता दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आर्थिक देणे, घरगाडा चालविताना आर्थिक समस्या निर्माण होत होत्या. आधीच डोक्यावर कर्जाचे ओझे आणि आता हाताला काम नसल्याने मनोज झेंडे यांनी विष पिऊन करून टोकाचा निर्णय घेतला.

नेमके काय लिहिले आहे चिठ्ठीत?

केशकर्तनालय दुकान मालक मनोज झेंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहिली असून, या चिट्ठीत त्यांनी लिहिले आहे की, ‘मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर, बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये, ही माझी कळकळीची विनंती आहे. सरकारने हातावरचे पोट असणार्‍या सलून दुकानदाराला कोरोनाचे नियम, अटी-शर्थी लावून काम करण्याची परवानगी द्यावी अन्यथा प्रत्येक नाभिक  बांधवांना अर्थिक मदत करावी - मनोज झेंडे


 
Top