तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील जळकोट येथून हंगरगा( नळ ), बोरगाव, सलगरा मड्डी, आचलेर, आलूर जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था  झाली असून प्रवाशी नागरिकांसह वाहनधारकांना अत्यंत यातनामय प्रवास करावा लागत असल्याने शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानीस तोंड द्यावे लागत आहे. यामुळे सदर मार्गावरील रस्ता दोन्ही बाजूने प्रत्येकी तीन फुटासह रुंदीकरन वाढवून नव्याने मजबुतीकरण करून प्रवासी नागरिकांची यातना पासून कायमस्वरूपी मुक्तता करावी अशी मागणी उपरोक्त गावच्या प्रवासी व वाहनधारकांतून केली जात आहे. 

या बाबत थोडक्यात वृत्त असे की, तुळजापूर तालुक्यातील  जळकोट हे अंदाजे जवळपास चौदा ते पंधरा हजार लोकसंख्येचे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसलेले असून परिसरातील तब्बल 20 ते 25 खेड्यांचे व्यापारी, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक केंद्र आहे. त्यामुळे येथे विद्यार्थी नागरिक व्यवसायिक आदींसह तुळजापूर, उस्मानाबाद, उमरगा, सोलापूर आदी ठिकाणी कार्यालयीन, शैक्षणिक, व्यवसायिक, आरोग्य विषयक कामासाठी नागरिकांचा सतत राबता असतो. सदर विद्यार्थी, नागरीक प्रवाशांना  हंगरगा (नळ), बोरगाव, सलगरा मड्डी या मार्गावरून तर बोळेगाव, कुन्सावळी, सिंदगाव येथून तर अक्कलकोटहून येणार्‍या घोळसगाव मार्गे किणी, काझीकणबस, नंदगाव मार्गे जळकोटला येणाऱ्या व जाणाऱ्या बसेस, मालवाहतूक वाहने, खाजगी चार चाकी जीप, टेम्पो, टमटम आदी वाहनांना सदर रस्त्यावरून सतत ये-जा करावी लागते. मात्र सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने बऱ्याच ठिकाणी रोडचा वरचा तरच उखडून निघाल्याने प्रवाशांना व वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वाहन नादुरूस्त होणे, पाटे तुटणे, टायर फुटणे आधी वित्तहानीसह इंधनाचा खर्चही भरमसाठ होत आहे. त्याचबरोबर सर्वात नुकसानदायक बाब म्हणजे प्रवासी नागरिकांना दणक्यात प्रवास करावा लागत असल्याने मणक्यांचा आजार, मानेचा आजार बळावत असून शारीरिक, मानसिक नुकसानीसह आर्थिक भुर्दंडास तोंड द्यावे लागत आहे. इतकेच नव्हे तर अगोदरच सदर रस्ता एकच वाहन जाण्यापुरता आहे. त्यात अगदी डांबरी रस्त्याला लागूनच सरकारी बाभळीची झुडपे भरमसाठ वाढल्याने वाहनचालकांना संबंधित बाबळीच्या फाट्यांचा ओरखडा बसत असल्याने शारीरिक इजा होऊन दुचाकी धारक जखमी होत आहेत. त्यामुळे रोड लगत असलेली काटेरी झुडपे तात्काळ तोडून रस्ता मोकळा करावा व पुढील धोका टाळावा अशी मागणीही प्रवासी वाहनधारकांकडून होत आहे. राज्य व केंद्र शासन रस्त्यांची नवनिर्मिती, दुरुस्ती, पुनर्निर्माणीकरण आदींसाठी इंधनावर विविध कर तर आकारतेच शिवाय वाहनधारकांकडून दीर्घ कालावधीसाठी प्रादेशिक परिवहन विभागामार्फतही रस्ता कर वसूल करत असते. असे असूनही नागरिकांना दैनंदिन वहिवाटीसाठी असलेले रस्ते मात्र खड्डेमय असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून वसूल केलेली कर रुपी कोट्यवधींची रक्कम रस्ते नवनिर्मिती, दुरुस्ती, न करता कोणाच्या घशात जाते असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे. त्यामुळे उपरोक्त बाबींचा संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने विचार करून नागरिकांना सदर मार्गावरील रस्ते सुव्यवस्थित करून बहाल करावेत अशी मागणी केली जात आहे. 

याबाबत मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी, तहसीलदार, संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी याबाबत लक्ष घालून सदर रस्त्याची दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन फूट रुंदीकरण करून पूर्वीचा रस्ता किमान एक ते दीड फूट खोल उकरून आवश्यक हॉटमिक्स खडीने करावा जेणेकरून वारंवार खड्डे होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी अशी मागणी प्रवासी नागरिक व वाहनधारकांतून होत आहे.

 
Top