उस्मानाबाद / प्रतिनिधी:-

कोरोनाच्या काळात रुग्णांना ऑक्सीजन सुरळीतरपणे मिळावा, यासाठी वैयक्तिक 11 लाख रुपयांच्या ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन  खरेदीचे निर्देश पालकमंत्री श्री. शंकरराव गडाख यांनी दिले आहेत. यासाठी 11 लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले असून यातून तात्काळ मशीन खरेदी करण्यास सांगितले आहे.

कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असताना शासनाकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात नियमितपणे पुरेसा ऑक्सीजन पुरवठा व्हावा, आवश्यक संखेने रेमडीसीव्हरचे औषध मिळावे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान सध्या जिल्ह्यात बेड उपलब्ध होत आहेत. परंतु, रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन पुरवठा होणे अपेक्षित आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात रुग्णांना त्या-त्या भागातच तात्काळ सेवा मिळावी, यासाठी चार ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी निधीचे नियोजन केले आहे. यासाठी चे प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ शासनास  सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री गडाख यांनी दिल्या. शिवाय जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ऑक्सीजन कॉन्सट्रेटर आणि त्या अनुषंगीक सुविधा ,कोरोनासाठी आवश्यक औषधी ई.बाबींसाठी एक कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे.

 त्यामुळे रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन तसेच औषधे मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान सध्या अनेक रुग्णांना ऑक्सीजनची गरज लागत आहे. अचानक धाप लागल्याने ऑक्सीजन मिळत नाही. परिणामी रुग्णाच्या जीवावर बेतते. त्यामुळे 11 लाख रुपये वैयक्तिक मदत करीत रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन खरेदी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तात्काळ मशीन खरेदी करून गरजू रुग्णांसाठी उपयोगात आणण्याच्या सुचना दिल्या आहेत. हे मशीन हवेतून ऑक्सीजन निर्मिती करते. तोच ऑक्सीजन रुग्णांना तात्काळ देता येतो. अशा मशीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येतात. एखाद्या रुग्णाला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठीही अशा मशीन उपयोगी पडतात. रेमडीसीव्हर इंजेक्शनपेक्षा या मशीन गरजेच्या आहेत. यातून रुग्णांचे जीव वाचविण्यास मदत होऊ शकते. अशा ऑक्सीजन निर्मितीच्या मशीन खरेदी करून गरजू रुग्णांना ऑक्सीजन देण्यासाठी वापरण्यात याव्यात अशा सुचना श्री. पालकमंत्री गडाख यांनी दिल्या आहेत. 


 
Top