उस्मानाबाद / प्रतिनिधी

शिक्षकांचा समाजामध्ये अत्यंत उच्च स्थान आहे ते जपण्याचे काम शिक्षकासह ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे करावे. एखाद्या कोपऱ्यातील  चांगल्या कामाची दखल समाज घेत असतो. विद्यार्थ्यांना काय हवे ? हे शिक्षकांनी अंगीकारून ते विद्यार्थ्यांना शिकविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी देखील फक्त पुस्तकी किडा न बनता सर्व प्रकारचे विविधांगी कलागुण अंगी बाळगावेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील यांनी केले.

उस्मानाबाद तालुक्यातील वरवंटी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक नितीन चंदनशिवे यांना नुकताच तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व वरवंटी ग्रामस्थांच्यावतीने चंदनशिवे यांच्या सत्काराचे आयोजन दि.२७ मार्च रोजी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक अंकुश जगदाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विमल देशमुख, उपसरपंच इंद्रजीत देशमुख, शिवाजी देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पंडित, माजी उपसरपंच सिकंदर खतीब, बबन बेद्रे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संतोष बेद्रे, बाळासाहेब बेद्रे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना विक्रम पाटील म्हणाले की, प्रत्येकाच्या अंगी कला असते. परंतू कलाकारांकडे अहंकार ऐवजी जिद्द असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी उत्तम गायक, क्रीडांगण यासह सर्व प्रकारची माहिती आत्मसात करण्याबरोबरच विद्यार्थ्याला वेळप्रसंगी गोंधळी देखील बनता आले पाहिजे. तर शिक्षक व विद्यार्थी असलेली भीती मेली तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान ग्रहण करता येते. विशेष म्हणजे शिक्षकांनी अक्षरांच्या अवयवांचे सतत सराव केल्यास विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर निश्चितच सुधारते असे सांगून ते म्हणाले की, प्रत्येक घरामधील मुले व मुली शिकल्या पाहिजेत. शिक्षण झाल्यानंतर नोकरीच करावी असा आग्रह धरण्यापेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रात अफाट संधी निर्माण झाल्या असून त्या संधीचा उपयोग करावा. तसेच ग्रामीण भागातील माणूस शेती व राजकारणात अडकला आहे. त्यामुळे तरुणांनी शेती ही वडीलधाऱ्यांकडे सोपवून  त्यांनी व्यवसायाकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले. तर शाळेतील शिक्षकांच्या चुका शोधणारे व त्यांना प्रोत्साहन करणारे देखील गाववालेच असले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना नितीन चंदनशिवे म्हणाले की, शिक्षकांनी समाजात मिसळून विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी बाबत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. या अडचणी सोडविण्यासाठी गावकऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले तर गावचे व पर्यायाने शाळेचे नंदनवन होण्यास वेळ लागत नाही. तसेच प्रत्येकाकडे नम्रता असणे खूप गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अस्मिता शिंदे म्हणाल्या की, पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ शिक्षकच चांगले संस्कार व वळण लावण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करीत आहेत. त्यामुळे पालकांनी देखील या बालकांना शाळा सुटल्यानंतर घरी इतर कामे लावण्यापेक्षा शाळेत काय शिकविले ? त्याचा सराव  करून घेण्यावर पालकांनी भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.  तर अंकुश जगदाळे म्हणाले की, शिक्षकांच्या हातून विद्यार्थी घडविण्याचे अतिशय महत्त्वाचे व चांगले काम होत असते. जे पेराल तेच उगवेल या उक्तीप्रमाणे समाजातील इतर कुठल्याही घटकाने अजिबात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका असे आवाहन केले. तर आई-वडील हे आपले दैवत असून त्यांच्याशी प्रातारणा करु नका. गावातील प्रत्येक नागरिकांनी गावच्या विकासासाठी झटून प्रयत्न केले तर गावाची निश्चितच प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी दिनकर देशमुख, फौजी महेश बेद्रे, अझर शेख, मकसूद शेख, हुसेन शेख, शाम सरवदे, अल्लाउद्दीन शेख, शकील शेख, राम कांबळे, सलीम शेख, मल्हारी कांबळे,  भीमराव सरवदे, रंगनाथ देशमुख, विश्वजीत लोहार आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top