तुळजापूर / प्रतिनिधी- 

 येथील प्रासादिक वस्तूच्या दुकानदाराने भाविकांची विसरलेली पर्स तब्बल दोन वर्षानी परत केली. पर्समध्ये रोख रक्कम १० हजार रुपयांसह पॅन कार्ड, आधार कार्ड व महत्त्वाची कागदपत्रे व फोटो होते. दुकानदाराने दोन वर्ष भाविकांचा शोध घेतला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही, अखेर बुधवारी (दि.२४) सदर पर्स संबंधित भाविकांना सुपूर्द करण्यात आली. दुकानदाराच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

तुळजाभवानी मंदिराजवळील प्रसादिक वस्तूचे दुकानदार मनोज कल्याणराव देशमुख यांनी भाविकांची विसरलेली पर्स दोन वर्षापासून जपून ठेवली होती. देशमुख यांनी संबंधित भाविकांचा शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. अखेरीस पुजारी दिलीप खपले यांच्या सोबतच्या चर्चेत देशमुख यांनी पर्सचा विषय काढला. पुजारी खपले यांनी तातडीने हडपसर येथील त्यांच्या भाविकांना फोन केला व पर्समधील आधार कार्डवरील भाविकांबाबत चौकशी केली. पुणे येथील काळेपडळ - हडपसर येथील भाविक संगीताताई वाघमारे यांची ती पर्स असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे योगायोगाने ते भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरातच आलेले होते. लगेचच त्या भाविकांशी संपर्क साधून दुकानासमोरच सर्व खात्री करून त्या भाविकांना ती पर्स जशास तसी परत केली. यावेळी पुजारी दिलीप खपले, इंद्रजित साळुंके, बाळासाहेब भोसले आदींची उपस्थिती होती.


 
Top