उस्मानाबाद / प्रतिनिधी:

वाशीम जिल्ह्यातील चोरीची स्प्लेंडर वापरून तुळजापुरातील दोघांनी दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला असून, दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि.११) करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील ज्ञानेश्वर मच्छिंद्र धुरगुडे ४ मार्चला दुपारी साडेबारा वाजता सपत्नीक तुळजापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाैकातील प्रकाश फुटवेअरसमोर दुचाकी लावून खरेदीसाठी गेले होते.त्यांच्या दुचाकीला अडकवलेली ११ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५ भार चांदीचे पैंजण असलेली पर्स चोरट्याने चोरुन नेली. यात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासात तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, पोहेकॉ राठोड, पोकॉ माळी यांच्या पथकाने नमूद चोरीच्या मालासह आरोपी गणेश बोरकर (२८ वर्षे) व विजय भगवान बोराडे (२० वर्षे, दोघे रा. मातंगनगर, तुळजापूर) यांना गुरूवारी ताब्यात घेतले. चोरी करण्यासाठी त्यांनी वापरलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच३७, एच ३४७२) जप्त केली.दुचाकीची पोलिसांनी खात्री केल्यानंतर सदर दुचाकी चोरीची असून वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दागिने चोरणाऱ्यांसह वाशिम जिल्ह्यातील दुचाकी चोरीचाही गुन्हा उघडकीस आणला, त्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.


 
Top