अर्जात फेरबदलाची सुविधा; आधार प्रमाणीकरण बंधनकारक

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर लॉटरीत अद्याप नाव न आलेल्या शेतकऱ्यांना आता अर्जातील बाबींमध्ये विनाशुल्क बदल करता येणार आहेत. तसेच नव्याने अर्ज स्वीकारणे सुरू झाली असून, त्यासाठी कोणतीही अंतिम मुदत ठेवण्यात आलेली नाही. 

  कृषी खात्याच्या विविध योजनांमधील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याची किचकट पद्धत आता बंद करण्यात आली आहे. पारदर्शकतेसाठी सर्व सुविधा देणारे https://mahadbtmahait.gov.in हे महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. बहुतेक योजनांसाठी एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळाल्याने 12 लाख शेतकऱ्यांनी पहिल्याच टप्प्यात 24 लाख बाबींसाठी अर्ज केले आहेत. कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) म्हणाले की, पोर्टलवर २०२०-२१ साठीच्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार काढलेल्या लॉटरी मधील शेतकऱ्यांना काही ठिकाणी पूर्व संमती पत्र देणे सुरू आहे. तर काही योजनांमध्ये निधीची उपलब्धता पाहून कामे सुरू आहेत. मात्र कोणत्याही योजनेसाठी निवड न झालेल्या शेतकरी आता पुन्हा पोर्टल वर जाऊन त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतात. आम्ही असे सुधारित अर्ज २०२१-२१ करिता ग्राह्य धरणार आहोत. तसेच असा बदल करणार्‍या शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्यभर कोणत्याही सामुहीक सेवा केंद्राची मदत शेतकरी घेऊ शकतात. मात्र कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या मेलवर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक मात्र आधी महाडीबीटी च्या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.   एखाद्या शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसल्यास प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. आधारचा असा नोंदणी क्रमांक मिळताच पुन्हा महाडीबीटी पोर्टल मध्ये तो क्रमांक नमूद करून योजना साठी अर्ज करता येईल. मात्र आधार क्रमांक प्रमाणित करून घेतला नसल्यास अनुदानाचे वितरण होणार नाही, असे कृषी खात्याने पुन्हा स्पष्ट केले आहे.

     शेतकऱ्यांना अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.  यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय मुंबई, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.


राज्यातील शेतकरी आता कोणत्याही वेळी नोंदणी किंवा विविध योजना साठी अर्ज ऑनलाईन करू शकतील. त्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली नाही. लॉटरी निघण्याच्या काही दिवस आधी अर्ज देण्याची प्रक्रिया स्थगित होईल. लॉटरी निघाल्यानंतर पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अनुदान वाटण्यासाठी शासनाकडून निधी कसा उपलब्ध होईल त्यानुसार लॉटरी निघत राहील. 

    विकास पाटील,

 कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग


 
Top