उमरगा / प्रतिनिधी-

थंडीचे प्रमाण कमी होत चालले असून, ऊन वाढू लागले आहे. दुपारी बारा ते तीन दरम्यान रस्ते सामसुम दिसत आहेत. मागील आठ दिवसांत तापमानात वाढ होत असुन गरीबांचे फ्रीज असलेली मातीचे डेरे विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होत आहेत.

उमरगा तालुक्यात गेल्या आठवडाभरात पारा दररोज वाढताना दिसतो आहे. होळीनंतर थंडी हद्दपार होऊन कडक उन्हाळ्याला सुरुवात होत असते. परंतु या वर्षी अधिक महिना आल्याने होळीपूर्वीच ऊणाचा चटका सहन करावा लागत आहे.

सकाळी नऊपासूनच ऊन तापू लागले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत गेल्या आठवडाभरात सरासरी ३३ ते ३४ डिग्री तापमान नोंदवले गेले. परिणामी दुपारच्या वेळी रस्त्यावरील गर्दी रोडावली आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे द्राक्षातील साखरेचे प्रमाण वाढले असून ती पिवळसर दिसत आहेत. त्यामुळे भारतीयांची आवड लक्षात घेता सध्याचा काळ द्राक्ष खाण्याचा सर्वोत्तम आहे. हरभरा, सूर्यफूल, ज्वारी, गहू काढणीची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांची उन्हाच्या तडाख्यातही काढणीसाठी धावपळ सुरु आहे.

 आरोग्याची काळजी घ्या 

हा ऋतूबदलाचा काळ आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने, एरवी दररोज अडीच तीन लिटर पाणी घेत असाल; तर त्यात एक लिटरची वाढ करा. ते क्षारयुक्त असावे. लिंबू-मीठ सरबत वाढवा. दुपारी ११ ते ३ दरम्यान बाहेर पडणे थांबवा. उष्माघातापासून बचावासाठी डोकं झाकूनच बाहेर पडा. रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.  

- डॉ. प्रशांत मोरे  

 
Top