उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व हक्काचा असलेल्या पिक विम्याबाबत अनेक दिवसाच्या संघर्षानंतर राज्य सरकारने विमा कंपनीला ‘सूचना’ दिल्या. परंतु हक्काचा पीक विमा देण्यासाठी विमा कंपन्या असमर्थता दर्शवीत आहेत. दुसरीकडे २४ तास बिनबोभाट योग्य दाबाने वीज न देता, कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या भयावह परिस्थितीचा थोडासाही विचार न करता महाविकास आघाडी सरकार सक्तीने वीज बिलाची वसुली करत आहे. भारतीय जनता पार्टी याचा तीव्र निषेध करत आहे व जनतेनेच आता सत्ताधार्‍यांना थेट जाब विचारवा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्यामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली होती. ऊर्जा मंत्री ना. नितीनजी राऊत यांनी वीज बिल माफी व तत्सम घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारने जनतेला याबाबत कोणताही दिलासा दिला नाही. याउलट सक्तीने वीज बिलाची वसुली सुरू केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीज कनेक्शन तोडणीला स्थगिती देणार्‍या या विश्वास घातकी सरकारने अधिवेशन संपताच जोमाने वीज तोडणी मोहीम सुरू केली. मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा देखील विचार या निर्दयी सरकारने केला नाही.

शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून देता येत नाही, इतर राज्यांप्रमाणे महामारीच्या काळात गोरगरिबांची मदत करता येत नाही. परंतु दिवसातील ८ तास सुद्धा योग्य दाबणे वीज न देता रझाकारांसारखी सक्तीने वसूली करणे मात्र या सरकारला चांगले जमते असेच म्हणावे लागेल. या अकार्यक्षम, निष्ठुर व खोटारड्या शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. याबाबत जनआंदोलन उभे करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गावात बैठका घेण्यात येत आहेत. पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलने करून सरकारला वठणीवर आणण्याचे काम तर केलेच जाणार आहे, त्याच बरोबर जनतेने देखील आता सत्ताधारी लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना या दोन्ही विषयांबाबत थेट जाब विचारावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केले आहे.


 
Top