उस्मानाबाद  / प्रतिनिधी- 

 आगामी ५८ व्या राष्ट्रीय इनलाइन हॉकी स्पर्धेसाठी राज्याचा वरिष्ठ पुरुष गटाचा संघ महाराष्ट्र स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पी. के. सिंग यांनी नुकताच जाहीर केला आहे. उस्मानाबादच्या प्रज्योत कावरे कडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात असून महाराष्ट्र संघात प्रज्योतसह उस्मानाबाद जिल्ह्यातील अभिजित कंदले, कैलास लांडगे, अजिंक्य जाधव, अमित बहिरे खेळाडूंना स्थान मिळाले आहे. संघ व्यवस्थापकपदी प्रवीण गडदे यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या वतीने ५८ व्या राष्ट्रीय इनलाईन हॉकी स्पर्धा ४ एप्रिल ते १० एप्रिल कालावधीत चंदिगढ येथे पार पडणार आहेत.

दरम्यान उस्मानाबाद जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने निवासी तहसीलदार तुषार बोरकर व जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष अॅड. जयंत जगदाळे यांच्या हस्ते राष्ट्रीय इनलाइन हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल अभिजित, कैलास, अजिंक्य, अमित व प्रज्योत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक अभय वाघोलीकर, गणेश वाघमारे, प्रभाकर खरमाटे आदींसह संघटनेचे पदाधिकारी खेळाडूंची उपस्थिती होती.

यासाठी संघाच्या खेळाडंूनी जोरदार सरावास सुरुवात केली असून चंदिगढमध्ये होणाऱ्या स्पर्धेत यश मिळवू असा विश्वास व्यक्त केला आहे. संघाच्या प्रशिक्षकाकडून कसून सराव करून घेतला जात आहे.

 
Top