उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 तेरणा सहकारी कारखाना सुरू करण्याच्या मागणीचा जोर वाढत असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी मागणी करण्यासाठी नुकताच कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी खासदार-आमदारांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तेरणा तसेच तुळजाभवानी साखर कारखान्यांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने तेरणा व तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याला दिलेले कर्ज अनेक वर्षांपासुन थकीत असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक अडचणीत आहे. जिल्हा बँकेने या दोन्ही कारखान्यांवर कायद्यांतर्गत कारवाई करत हे कारखाने दीर्घ मुदतीवर चालविण्यासाठी देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देय असल्याने संबंधित विभागाने दोन्ही कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश घेतले. त्यामुळे ही रक्कम देईपर्यंत कारखाने सुरु करणे शक्य नाही. राज्य सरकारने या दोन कारखान्यांच्या कर्जापोटी जिल्हा बँकेला थकहमी दिलेली आहे, परंतु थकित कर्जाच्या रकमेपोटी निधी अजूनही उपलब्ध केला नाही. तेरणा कारखान्याचे विविध राजकीय पक्षांशी संबंधित सभासदांनी आ.राणाजगजितसिंह पाटील यांना भेटून एकत्रित कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्नाचे आश्वासन दिले होते.तद्नंतर आ. राणा पाटील यांनी स्थानिक खासदार, आमदार व जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना पत्र लिहून राज्य सरकारकडून किमान १० टक्के थकहमीची रक्कम मिळवणे अपेक्षित अस्लयाचे सांगितले होते. या माध्यमातून भविष्य निर्वाह निधीची देय रक्कम अदा करून कारखाना दीर्घ काळासाठी चालवायला देण्याची प्रक्रिया सुरु करणे शक्य असल्याचे सांगितले होते.

 
Top