उस्मानाबाद/ प्रतिनिधी

बुथ कार्यकर्त्यांनी आपआपल्या बुथवर सक्षमपणे काम करत आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, लोकसभा विधानसभा निवडणूकामध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन आ.अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

 शनिवारी दि.६ रोजी उस्मानाबाद येथे शहर व ग्रामीण भाजपा बुथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष , प्रदेश बुध्दजीवी आघाडीचे दत्ताभाउ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, अॅड.अनिल काळे, अॅड.व्यंकट गुंड, अॅड.खंडेराव चौरे, नेते नेताजी पाटील, सतीश दंडनाईक, जिल्हा सरचिटणीस संताजी चालूक्य, माधव पवार, नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भाजयूमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.पवार पुढे म्हणाले की, राज्यातील सत्तारुढ तीन पक्षाचे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच शेतकऱ्यांना पीकविमा मदत दिलेली नाही. महिलावरील अत्याचारात वाढ झाली असून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कोरोना जागतिक महामारीची परिस्थिती नियोजनपूर्वक हाताळल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. तसेच गावागावात काम करणार्‍या छोट्या व्यावसायिकांना आत्मनिर्भर योजनेतून मदत केल्यामुळे तसेच गोरगरीबांना अल्प दरात तांदूळ, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून मोफत गॅस, महिलांच्या खात्यावर जनधन योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत यांच्यासह कोरोना काळातील समाजोपयोगी मदतीमुळे केंद्र सरकारबद्दल जनतेच्या मनात सहानुभुती निर्माण झाली आहे. याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी गावागावात प्रत्येक नागरिकांपर्यत पोहचविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरु करण्यात आलेल्या लोकाभिमुख योजना बंद करुन जनतेचे नुकसान करत आहे. ते केवळ योजनाच बंद करत नसून मागील सरकारमध्ये राबविलेल्या योजनांचा आकस बुध्दीने चौकश्या लावत आहे. हे तिगाडी सरकारचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. मात्र,फडणवीस सरकारच्या काळातील विविध योजना लोकांच्या मनात आहेत. शेतकर्‍यांना अनेक नैसर्गिक आपत्तीवेळी भरघोस आर्थिक मदत, भरघोस पीकविमा, जलयुक्त शिवारसारख्या चांगल्या योजनामधून गाव शिवारात वाढलेली पाणीपातळी बहरलेली शेती आणि शेतकरी समृध्द होत असताना या सरकारने शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करत शेतकर्‍यांचे नुकसान करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे बुथ कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत हे पोहचविण्याची अवश्यकता आ.अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली. 

या बैठकीत बोलताना   काळे यांनी जिल्ह्यातील सर्व बुथनिहाय रचना पूर्ण होत आल्याची माहिती दिली. या बैठकीचे सुत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस श्री.प्रदीप शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन नेताजी पाटील यांनी केले. बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top