उस्मानाबाद / प्रतिनिधी

परंडा शहरातील काशिमबाग परिसरात चोरट्यांनी चाकू, सशस्त्र हत्याराचा धाक दाखवून सोने चांदी, स्मार्ट फोन व रोकड अशी एकूण २ लाख ६६ हजार रुपयांची धाडसी चोरी केली. ही घटना रविवारी (दि. २१) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पत्रकार शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलिस अधिक्षक संदिप पालवे यांची भेट घेतली असता त्यांनी या प्रकरणातील एक आरोपी पकडला असून कांही मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित दोन आरोपी ंची माहिती मिळाली आहे, असे सांगितले. 

परंड्यात करमाळा रस्त्यावर काशीमबाग जवळील पत्रकार सुरेश घाडगे यांच्या शेतातील घरात रविवारी पहाटे ५ ते ६ चोरांनी घरात प्रवेश करून त्यांची खोली बाहेरून बंद केली. तर काही खोल्यांना बाहेरून दोऱ्या बांधल्या. सुरेश घाडगे यांचा मुलगा रोहित झोपलेल्या खोलीत चोरट्यांनी प्रवेश करून त्याला शस्त्राचा धाक दाखवत कपाटातील मंगळसूत्र, नेकलेस, कानातील फुले, अंगठी, नथ असा सोन्याचा तर चांदीचे पैंजण चोरुन नेले. तसेच इतर खोलीत झोपलेल्या महिलांना देखील शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकाऊन घेतले. यामध्ये २ लाख ६० हजार रुपये व सोने-चांदीसह रोकड ६८४० रुपये असा एकूण २ लाख ६६ हजार ८४० रुपयाचा ऐवज लुटुन चोरटे पसार झाले. सुरेश घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. 

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने घाडगे यांच्या घरी पडलेल्या दरोड्याप्रकरणी तातडीने तपास करून आरोपींना पकडावे व मुद्देमाल जप्त करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना केली होती. या शिष्टमंडळात पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top