उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आपण चारित्र्यसंपन्न असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी समाजातील एका महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागला होता. जात पंचायतीच्या या अमानुष न्यायनिवाड्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात दि.१६ फेब्रुवारी रोजी घडला आहे. पण आता या प्रकराला एक गंभीर वळण मिळाले आहे. पीडित महिलेवर गावातील एका व्यक्तीनं आणि एका पोलीस कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडिता आणि तिच्या पतीनं केलाय.विशेष म्हणजे पत्नी गायब झाल्यानंतर पतीने संशय घेऊन उकळत्या तेलात हात घालण्यासाठी विवश केले होते. 

पीडित महिला आणि तिचा पती आता माध्यमांसमोर आले आहेत. गावातील एक व्यक्ती आणि परंडा पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याने संबंधित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. नवऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 व्हिडीओ  व्हायरल 

पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जायपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पतीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं.

या अघोरी आणि अमानुष परीक्षेचा परिणाम त्या महिलेला माहिती होता. ती गयावया करत तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी बळजबरी केली. या परीक्षेत पास-नापास कसं ठरतं हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर उकळत्या तेलातील नाणं बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध! जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं! अशा प्रकार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशी अमानवी शिक्षा देणाऱ्या जात पंचायत विरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.


 
Top