उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

अंधश्रद्धा,व्यसनाधीनता आणि भोळ्या समजुती नष्ट करण्यासाठी संत सेवालाल महाराजांनी समाजाला संन्मार्गाची जाणीव करून दिली असे मत सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ.मेघा शिंदे यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती आज (दि 15 फेब्रुवारी) साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ.संजय तूबाकले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर,कृषी अधिकारी निरडे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी चौगुले, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी कवठे यांच्यासह प्रशासन अधिकारी (आरोग्य) उइतके यांची यावेळी उपस्थिती होती.

 उपस्थित मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. मेघा शिंदे यांनी श्री संत सेवालाल महाराज यांचे विचार सभागृहासमोर मांडले. तेलंगणा राज्यातील गोगालडोडी (ता.गुत्ती जिल्हा अनंतपुर) येथे संत सेवालाल महाराजांचा जन्म झाला. महाराज निरक्षर असून देखील त्यांनी समाज प्रबोधनासाठी संत वचने दोहे सोप्या आणि सरळ अशा बंजारा बोली भाषेत मांडली. अंधश्रद्धा, व्यसनाधिनता,भोळ्या समजुती दूर होण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने लिहिली त्या माध्यमातून समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली असे डॉ.शिंदे यांनी सांगितले.

जयंती कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top