उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

 सकारात्मक मनस्थिती शिवाय आत्म परिवर्तन होणे शक्य नाही. संत रविदास महाराजांनी समाजाला दिलेला हा संदेश परिवर्तनाची लाट निर्माण करतो असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

    जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये डॉ. विजयकुमार फड,विस्तार अधिकारी (शिक्षण) सुरेश वाघमारे यांच्यासह मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. सर्व मानवजात ही एकच आहे अशी शिकवण संत रविदास महाराजांनी समाजाला दिली असे मत विस्तार अधिकारी शिक्षण सुरेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

   विषमतावादी समाज व्यवस्था बदलण्यासाठी संत रविदास यांनी संपूर्ण उत्तर आणि दक्षिण भारतात सामाजिक कार्याचा प्रचार आणि प्रसार केला. मूर्तीपूजा सारख्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला,जात,लिंग यांच्यामधील सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी संत रविदासांनी समाजसुधारकाची भूमिका पार पाडली. प्रत्येकाने स्वतःची मनस्थिती सुधारल्याशिवाय परिस्थिती आत्मसात करता येत नाही. हेच संत रविदासांनी मन चंगा तो कटौती मे गंगा.....या आपल्या विचारधारेने स्पष्ट  केले आहे. मीपणा सोडल्याशिवाय व्यक्तीमध्ये परिवर्तन होणे शक्य नाही. परिस्थिती आणि मनस्थिती एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

      संत रविदास महाराज यांच्या जयंती कार्यक्रमास  सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ए.व्ही.सावंत, आरोग्य विभागाचे गिरी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पोथळे, प्राथमिक शिक्षण विभागाचे लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद प्रयाग, सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी बी.आर. हजारे,बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी नागनाथ कुंभार, ग्रामपंचायत विभागाचे शिनगारे, शिक्षण विस्तार अधिकारी सांगळे, श्रीमती कुंभार यांच्यासह जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी कोरोना संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक सुरक्षा अंतर ठेवून उपस्थित होते.


 
Top