उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 जिल्हा परिषदेचे काही शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या आई-वडीलांचा सांभाळ करीत नसल्याच्या त्यांच्या आईवडिलांनी जिल्हा परिषदेकडे तक्रारी दिलेल्या आहेत. आई वडीलांचे उपकार विसरून त्यांच्या वृद्धापकाळात त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी न स्विकारणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांचे ३० टक्के वेतन कपात करुन ते त्यांच्या आई वडीलांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिताताई कांबळे यांनी दिली आहे.

या वेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जे कर्मचारी आपल्या आई-वडीलांना सांभाळत नाहीत. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून तीस टक्के रक्कम कपात करून ती त्यांच्या आई-वडिलांच्या बँकेतील खात्यावर थेट जमा करण्याचा मी स्वतः दि. ९ डिसेंबर २०२० रोजीच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडलेला ठराव बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच जन्मदात्या आई वडीलांना न सांभाळणे ही अत्यंत खेदजनक बाब असून उस्मानाबाद जिल्हा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. तर जिल्ह्याला एक वेगळी सामाजिक व सांस्कृतिक नीतिमूल्यांची ओळख असल्यामुळे अशा प्रकाराने समाजामध्ये चुकीचा संदेश न जाता संबंधित कर्मचाऱ्यांच्या वागणूक व वर्तनामध्ये योग्य बदल करणे आवशयक आहे. त्यामुळे या ठरावाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत.

 
Top