उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील भंडारी शिवारात हॉटेल मालकावर गोळीबार करून फरार झालेल्यांपैकी तिघांना परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. याप्रकरणी तपासात उस्मानाबाद एलसीबीला ते गंगाखेड येथील रोड रॉबरीतील आरोपी असल्याचेही कळाल्यावर त्यांनी परभणी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार तेथील एलसीबी पथकाने कारवाई करत तिघांना गजाआड केले.

बुधवारी दुपारी भंडारी शिवारात हॉटेल रिलॅक्स येथे किरकोळ कारणावरून हॉटेल मालक व याप्रकरणातील आरोपींमध्ये वाद होऊन थेट हॉटेल मालक बाळासाहेब माेरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाच्या तपासादरम्यान उस्मानाबाद एलसीबीचे पोलिस निरीक्षक घाडगे व टीमला प्रथम आरोपींच्या वाहनाची व नंतर आरोपींचीही माहिती मिळाली. त्यानुसार याप्रकरणी अर्जुन वडवणे, साहिल जाधव (परभणी),विश्वकर्मा (नाशिक), मुन्ना भोसले व अन्य एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. यातील विश्वकर्मा यास हॉटेलवरच कामगारांनी पकडून चोप दिला होता. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

दरम्यान एलसीबी पथकाने आरोपीच्या वाहनाची माहिती काढल्यावर राम केंद्रे हे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याचे वाहन किरायणे आणल्याचे व आरोपीबाबत इतर माहितीही समोर आली. यामध्ये सदरील आरोपींनी गंगाखेड येथे रोड रॉबरी केल्याचे समोर आल्यावर उस्मानाबद एलसीबीने याबाबत परभणी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर परभणी एलसीबीने तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी अर्जून बडवणे, मुन्ना भाेसले व साहिल जाधव यांना अटक केली आहे. या आरोपींना लवकरच गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी उस्मानाबादेत आणले जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.


 
Top