उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती तुळजापूर अंतर्गत बाळेश्वर महिला उमेद ग्रामसंघाच्यावतीने बारूळ येथे मराठवाडयातील पहिल्या घरकूल मार्टचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना यासारख्या केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकूल योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभार्थींना घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य प्रामुख्याने विटा, खडी, लोहा, तारा, बाथरूम भांडे, पाईप तसेच इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी तालुक्याला जावे लागते असे यामध्ये लाभार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. यामुळे उमेद अंतर्गत बाळेश्वर महिला ग्रामसंघ बारुळ यांच्यावतीने  लाभार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम साहित्य गावातच उपलब्ध व्हावे, या हेतूने घरकूल मार्ट सुरू करण्यात आले आहे.     

 यासाठी बाळेश्वर ग्रामसंघाच्या अध्यक्षा सिंधुताई सुपनार,प्रेरणा प्रभागसंघाच्या अध्यक्षा सविता सालपे, एम. सी. आर. पी. सुनीता क्षीरसागर यांनी हा मार्ट सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले. मराठवाड्यातले पहिले घरकूल मार्ट सुरू करताना मनस्वी आनंद होतो आहे. तसेच महिलांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमातुन इतर ग्रामसंघ,प्रभागसंघ आणि महिलांना प्रेरणा मिळेल आणि उपजीविकेच्या संधी सुकर होतील. तसेच महिलांनी व्यापक विचार करून इतर महिलांना सोबत घेऊन एकमेकींचे मनोधैर्य वाढेल या पद्धतीने महिलांच्या सर्वांगीण विकास, उन्नती आणि प्रगतीसाठी काम करावे असे यावेळी श्रीमती कांबळे यांनी  सांगितले.

 उमेद अंतर्गत सुरू केलेल्या घरकूल मार्ट मधील साहित्य गावातच योग्य दरात उपलब्ध करून देण्यात आले  आहे. घरकूल योजनेच्या लाभार्थींनी तर या घरकूल मार्टमधून साहित्य खरेदी करावेच पण त्याचबरोबर शासकीय कार्यालये, इत्यादींना आवश्यक साहित्य घरकूल मार्ट मधूनच करावी तसेच जिल्हयात प्रत्येक तालुक्यात तीन घरकुल मार्ट होणार असून उमेद ग्रामसंघाच्या महिलांना शाश्वत उपजीविकेचा स्रोत  मिळणार आहे. महिलांनी नेहमी अग्रेसर राहावे असे श्री.नेवाळे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान जोगदंड यांनी केले, तसेच सूत्रसंचालन सुधीर सुपनार यांनी केले, यावेळी सुनीता क्षीरसागर यांनी  मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, अमोल सिरसट, गोरक्षनाथ भांगे, सहाय्यक गटविकास अधिकारी राऊत, जिल्हा समनव्यक मेघराज पवार, तालुका अभियान व्यवस्थापक दत्तात्रय शेरखाने, तालुका व्यवस्थापक चंद्रकला कनकी, अभिजित पांढरे, प्रभाग समन्वयक  कल्पना भुरे तसेच इतर प्रभाग समनव्यक तसेच गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रामसेवक केवळराम यांनी आभार मानले.


 
Top