येत्या प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारी-2021 रोजी शहरातील मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहे.
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सकाळी 9:15 वाजता होणार आहे.त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सकाळी 8:15 वाजता तर मध्यवर्ती शासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांच्या हस्ते सकाळी 8:25 वाजता ध्वजारोहन होईल.
ध्वजारोहण कार्यक्रमास येताना सर्वांना मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक आहे.अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे.प्रात अधिकारी आणि तहसीलदार हे जिल्हा उपविभागीय तसेच तालुका मुख्यालय येथे ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील.प्रजासत्ताक दिनी जिल्हयातील सर्व शासकीय आणि सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्हयातील ऐतिहासिक,महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत,असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी,असेही राज्य शासनाने कळविले आहे.
या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी,स्वातंत्रय सैनिक,शहिद जवानांच्या पत्नींना आणि आई-वडिलांना तसेच कोरोना योध्दा जसे डॉक्टर,सफाई कामगार,आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनांचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर (Social Distancing) संदर्भातील सर्व नियम पाळून हा कार्यक्रम यशस्वी करावयाचा आहे.याबाबतची खबरदारी त्या त्या ठिकाणच्या संयोजकांनी घ्यावयाची आहे.
प्रजासत्ताक दिनी वृक्षारोपण,अंतर शालेय,आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन(Online) पध्दतीने वादविवाद स्पर्धा,प्रश्न मंजुषा,देशभक्तीपर निबंध आणि कविता स्पर्धांचे आयोजन करता येईल.परंतु प्रभात फे-या काढण्यात येऊ नयेत.सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये.महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ करता येईल.समाज माध्यमावर विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांचे आणि भाषणांचे आयोजन करता येईल.असेही राज्य शासनाने कळविले आहे.
