उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनची सभा रविवारी (दि.१०) तुळजापुरात होणार आहे. या सभेला भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष विजय डांगरे, सचिव संजय नाईक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील अधिकाधीक खेळाडू व्हॉलीबॉलकडे आकर्षित व्हावेत यासाठी विविध मागण्या व्हॉलीबॉल असोसिएशनने केल्या आहेत. त्याविषयी या बैठकीमध्ये चर्चा होणार असुन मतेही जाणुन घेतली जाणार आहेत. यामध्ये मुख्यतः दहावीमध्ये गुणांबरोबरच, पोलिस भरतीसह रेल्वेमध्येही नोकरीसाठी आरक्षीत कोटा मिळाला पाहिजे अशी भुमिका असोसिएशनची आहे.

त्याचबरोबर या सभेत येणाऱ्या वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या विविध गटातील स्पर्धा कोणत्या ठिकाणी घ्यायच्या या विषयीही चर्चा होणार आहे. यात उस्मानाबादलाही एखाद्या स्पर्धेचे यजमानपद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्हा असोसिएशनच्या वतीनेही स्पर्धेचे संयोजकपद मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचा कार्यक्रम व स्थळ निश्चिती या सभेमध्ये होणार असल्याने राज्यातील व्हॉलीबॉल सदस्यांसह खेळाडुंचे लक्ष याकडे लागले आहे. या सभेला अधिकाधिक सदस्यांनी उपस्थित रहावे असे अावाहन ज्येष्ठ संघटक मन्मथ पाळणे, अध्यक्ष अंकुश पाटील, कार्याध्यक्ष गजानन गवळी, सचिव सचिन पाळणे व सहसचिव संजय देशमुख यांनी केले आहे.

 
Top