उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले आहे. यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.जिल्हयात आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत.तसेच खाजगी शिकवणी वर्ग कोचिंग क्लास सुरु झाले आहेत.त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे जिल्हाधिकारी यांनी  आदेश दिले आहेत.

 जिल्ह्यातील इयत्ता नववी ते इयत्ता बारावी चे वर्ग दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून तर इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी चे वर्ग दि. 27 जानेवारी 2021 पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. कोविड-19 चे प्रतिबंधात्मक उपाययोजना व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याच्या अटीवर जिल्ह्यातील खाजगी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत विनंती केली आहे. शासनाने अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. त्या सर्व अटी व शर्ती खाजगी शिकवणी वर्ग/कोचिंग क्लासेस यांनाही लागू राहतील आणि त्यांचे पालन करणे बंधनकारक राहील.एका शिकवणी वर्गामध्ये/खोलीमध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या अटीवर कमाल 40 विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत परवानगी राहील. (विहित सामाजिक अंतर पाळून वर्गामध्ये जर 40 पेक्षा कमी विद्यार्थी बसू शकत असल्यास तेवढ्याच विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसविण्याची परवानगी राहील.)

 कोचिंग क्लासेसच्या इमारतीमधील सर्व शिकवणी वर्गांचे/खोल्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सोबतच सॅनिटायझर लिक्वीड मशीन उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील. कोचिंग क्लासेस/हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत किमान 6 फूट अंतर असेल अशा पद्धतीने एका बाकावर एक विद्यार्थी या पद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवहीत दररोज अद्यावत करावी. यदा कदाचित संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact Tracing) करणे सोयीचे होईल.कोचिंग क्लासेंसनी कोविड-19 संसर्गजन्य आजार रोखण्याकरिता शासनाने निर्गमित केलेल्या सर्व निर्देशांचे पालन करणे अनिवार्य राहील.कोचिंग क्लासेस सुरु करण्यापूर्वी तेथील सर्व प्रशिक्षक,व्यवस्थापक व कर्मचारी यांची कोविड-19 ची चाचणी (RTPCR) करुन घेणे अनिवार्य राहील.

 कोचिंग क्लासेस मध्ये विद्यार्थी, प्रशिक्षक, व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांनी नेहमी मास्क वापरणे, थर्मल गन व पल्स ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायजरचा वापर, निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे.शिकवणी वर्ग/कोचिंग क्लासेसबाबत राज्य शासनाकडून आदेश/नियमावली निर्गमित झाल्यास त्याचे पालन करणे बंधनकारक राहील. ताप, श्वसनास त्रास, डोकेदुखी आदी कोविड-19 ची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश न देता त्यांना त्यांची आरोग्य तपासणी करण्याबाबत सूचित करण्यात यावे. सदरची परवानगी ही जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zones) मध्ये लागू असणार नाही.  

 या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

 
Top