डेव्हलपर्स फर्ममध्ये गुंतवलेल्या २१ लाख रुपयांच्या मोबदल्यात या फर्मच्या विकसीत जागेत हिस्सा न देता फसवणूक केल्याप्रकरणी लातुरच्या दाम्पत्याविरोधात उस्मानाबादेत आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, व्यंकट पांडुरंग पाटील व चंद्रकला व्यंकट पाटील (दोघे रा. लक्ष्मी कॉलनी, लातुर) या दाम्पत्याने संगणमताने दि.३० नोव्हेबर २००६ मध्ये शिवाजीराव रामराव गपाट (रा. आनंदनगर, उस्मानाबाद) यांच्याकडून श्रध्दा डेव्हलपर्समध्ये २१ लाख रुपायांची गुंतवणूक घेतली होती. या गुंतवणुकीच्या मोबदल्यात पाटील दाम्पत्याने श्रध्दा तेजराज डेव्हलपर्स या फर्मने विकसीत केलेल्या जागेत गपाट यांना हिस्सा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, वरील दाम्पत्याने आजतागायत तसे न करता तसेच गपाट यांनी गुंतवलेली रक्कमही परत न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीराव गपाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटील दाम्पत्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
