नॅचरल शुगर युनीट नं. 1 अहवाल वर्षात उसाचे उपलब्धते अभावी हंगाम बंद असल्याने आणि साखरेच्या दरातील घसरणीमुळे साखर कारखाना तोटयात जावूनही केवळ उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल शुगर नफ्यात असल्याचे कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी सांगितले. नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि.साईनगर रांजणी कारखान्याची 21 वी वार्षिक सर्व साधारण सभा नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दि. 30 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. खेळीमेळीचे वातावरणात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ठोंबरे म्हणाले, मागील वर्षीच्या तीव्र दुष्काळी परिस्थिती व विशेषतः मराठवाडयात निसर्गाची अवकृपा झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि आपले कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे क्षेत्र अत्यल्प शिल्लक राहिल्यामुळे कारखाना सुरू करणेही न परवडणारे होते, त्यामुळे कारखाना सुरू करणेही शक्य झाले नाही. साखर दराच्या दुष्टचक्रात सापडलेला मराठवाडयातील साखर उद्योग यशस्वी करून दाखवण्याचे काम नॅचरल शुगरने केले आहे आणि ते म्हणजे साखर कारखान्याने ऊस गाळप न करूनही व मागील हंगामातील शिल्लक साखरेच्या दरातील घसरणीमुळे तो तोटयात असतानाही तो नफ्यात आनण्याचे कौशल्य साध्य केले आहे आणि ते केवळ साखर कारखान्या बरोबरच उपपदार्थ निर्मितीमधून, डेअरी विभाग आणि डिस्टीलरीमुळे कारखाना नफ्यात आहे. साखर उद्योग टिकवून ठेवावयाचा असेल तर साखर उत्पादना बरोबरच उपपदार्थ निर्मिती करून त्या मधून नफा मिळवावा लागेल असे कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी सभेमध्ये सांगितले. उपपदार्थांचे माध्यमातून नॅचरल शुगर अहवाल वर्षात साखर, स्टील व कोजनरेशन कडील तोटा भरून काढून 7.60 कोटी रूपये नफ्यात असल्याचे सांगितले. कारखान्यास अहवाल वर्षात नफा झाला असला तरी तो व्यावसायीक नफा नसल्याचे बी.बी.ठोंबरे यांनी नॅचरल शुगरचेे सभासदांना लांभाश देता येत नसल्याचे त्यांनी नमुद केले.
मागील वर्षी मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नसल्यामुळे आपले कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात ऊस लागवड झालेली नसली तरी आपले अथक प्रयत्नाने आणि ऊस उत्पादक शेतक-यांच्या सक्रीय सहकार्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये ऊस विकासाच्या विविध योजना राबवल्यामुळे मागील लागवड हंगामामध्ये एकूण 10 हजार हेक्टरची ऊस नोंद झाली आणि त्याचे दृष्य परिणाम सध्या नॅचरल शुगरचे ऊस गाळपातून आपणा सर्वांच्या समोर दिसून येतच आहेत असे ही ठोंबरे यांनी सांगितले.
यावर्षीचे लागवड हंगामामध्ये झालेली ऊस लागवड आणि यावर्षी तुटत असलेल्या खोडव्यातून उत्पादीत होणारा सर्व नोंदीचा ऊस मोठया प्रमाणात असल्याने, पुढील वर्षी नॅचरल शुगर गाळप क्षमता वाढवून तो प्रतिदिन 7500 मे.टन ऊस गाळप करणार असल्याचे आणि सदर ऊसा पासून फक्त साखर उत्पादन न घेता 50 टक्के ऊसा पासून ईथेनाॅल निर्मिती करून व डिस्टीलरीचे टाकावू पदार्था पासून बायोगॅस व त्या पासून बायोसीएनजी उत्पादीत करून आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आणि नितीनजी गडकरी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी सांगितले. त्यामुळे आत्मनिर्भर भारताची सुरूवात शेतक-यांपासून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
चालु गळीत हंगाम बंद झाल्यानंतर कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्या बरोबरच आसवनी प्रकल्पाची क्षमता 1.00 लाख लिटर वरून 1.5 लाख लिटर प्रतिदिनी आणि नॅचरल डेअरीची क्षमता 50 हजाराहून 1 लाख लिटर प्रतिदिनी करणार असून दूध भूकटीचा प्रकल्प येत्या कांही दिवसांत उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखाना, डिस्टीलरी आणि दूध डेअरी यांचे माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन घेवून शेतक-यांनाही आत्मनिर्भर करण्याचा कसोसिने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
यावेळी नफा-तोटा पत्रकाचे वाचन लेखा परीक्षक एस.एच.कोचेटा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पांडूरंग आवाड, संचालक यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल ठोंबरे, टेक्नीकल डायरेक्टर यांनी मानले. यावेळी कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, सभासद हे मास्क आणि सुरक्षीत अंतर ठेवून उपस्थित होते.
