मीस कॉलवरून झालेल्या ओळखीतून पुढे प्रेमाचे संबध जुळले. महिनाभर फोनवरील बोलण्यातून भेटण्याचे ठरले. त्यानुसार सोलापूरची १९ वर्षीय तरुणी उस्मानाबादेतही आली. येथे आल्यावर प्रथमच भेटलेल्या त्या फोनवरील अज्ञात तरुणाने सदरील तरुणीला एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर दोन वेळा अत्याचार करून मध्यरात्री सोलापूरला नेऊन सोडले. ही खळबळजनक घटना दि.३० डिसेंबर रोजी घडली.
सोलापूर येथील एका १९ वर्षीय तरुणीची मिस कॉलच्या कारणातून उस्मानाबादजवळील एका अनोळखी तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर फोनवरील बोलण्यातून महिनाभरापूर्वी त्यांचे प्रेमसंबध जुळले. यातून त्यांनी एकमेकांवर भेटण्याचे ठरवले. त्यानुसार दि.३० डिसेंबरला सदरील तरुणी घरात टॉप शिऊन येते असे सांगून सकाळी ११ वाजता बाहेर पडली आणि उस्मानाबादला पोहचली. उस्मानाबाद बसस्थानकावर ते दोघे एकमेकांस पहिल्यांदाच भेटले व प्रत्यक्ष ओळखही झाली.
यानंतर सदरील तरुणाने सोलापूरच्या तरुणीला कारमध्ये बसवून शहरातील बार्शी रोडवरील एका लॉजवर नेले. तेथे “आपण पुणे येथे जाउन लग्न करु’ असे सांगून तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्या अज्ञात तरुणाने आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने तरुणीला दि.३१ डिसेंबरच्या पहाटे २.१५ वाजता सोलापूरला तिच्या घराजवळ नेऊन सोडले. त्यानंतर सदरील तरुणीने याप्रकरणी सोलापूर येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तेथून गुन्हा उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात वर्ग झाला असून शहर पोलिसांनी यातील चारही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केली असता मुख्य आरोपीला पोलिस कोठडी तर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
