उस्मानाबाद / प्रतिनिधी:

ट्रकचा धक्का लागल्याने ट्रक चालकासह त्याच्या सहायकाला लोखंडी राॅडने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी १४ तासांत अटक केली. हा प्रकार नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावर सोमवारी (दि.२८) घडला होता.

पोलिसांनी सांगितले की, सहदेव मधुकर ढाकणे व सहायक गणेश सांगळे (दोघे रा. शिरुरकासार,जि.बीड) हे सोमवारी दुपारी नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावरून ट्रक (के.ए. ६३,१२२२) घेऊन जात होते. यावेळी गंधोरा शिवारातील रुद्र हॉटेलसमोर त्यांच्या ट्रकचा एका विना क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीस धक्का लागला. यावर अज्ञात दुचाकीस्वाराने ट्रकचालक ढाकणे व सहायक गणेश सांगळे यांना लोखंडी गजाने मारहाण केल्याने गणेश सांगळे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. तर ढाकणे गंभीर जखमी झाले. यानंतर तो अज्ञात दुचाकीस्वार वाहनासह पसार झाला. यावरुन नळदुर्ग पोलिस ठाण्यात पोहेकॉ जितेंद्र कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुध्द भादंवि कलम ३०२,३०७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहून प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या विनाक्रमांकाच्या मोटारसायकलचा चालक त्या अपघातात किरकोळ जखमी झाला असल्याचे समोर आल्यानंतर नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि जगदीश राऊत यांच्या पथकाने तपासाची दिशा रुग्णालयांकडे वळवली. नळदुर्ग, तुळजापूर येथील रुग्णालये धुंडाळून जखमी तरुण उपचारासाठी आला होता काय, याची रुग्णालयाकडून माहिती घेण्यात आली. अखेर तो तरुण तुळजापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारकामी दाखल असल्याचे समजताच पथकाने सुंदर सतीश गवळी (२४, रा. वडगाव देव, ता. तुळजापूर) याला रुग्णालयातूनच अटक केली.

 
Top