उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कापूस पीक डिसेंबर-2020 अखेर शेतातून काढून टाकावे आणि फरदड घेऊ नये.डिसेंबर महिन्यानंतर पाच ते सहा महिने कापूस विरहित शेत ठेवल्यास शेंदरी बोंड अळीचे जीवनचक्र संपुष्ठात येते तसेच त्यामुळे पुढील हंगामात बोंड अळीचा प्रार्दुभाव कमी होतो.
शेंदरी बोंड अळी डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते.परंतु फरदडीमुळे अळीचे जीवनचक्र चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो.हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये,मेंढया तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत. कपाशीच्या प-हाटयांमध्ये कीडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने शेतकऱ्यांनी त्याची गंजी करुन बांधावर ठेवू नये.
पीक काढणीनंतर कपाशीच्या प-हाटया,व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे आणि पाला पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे.जिनींग-प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश,सापळे,कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स)लावावेत.अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यू.आर.घाटगे यांनी केले आहे.