उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहर आणि तालुक्यातील जनतेसाठी येथील मुख्य (प्रधान) टपाल कार्यालयातर्फे दि.04 ते 14 जानेवारी-2021 दरम्यान विशेष डाक मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन पोष्ट मास्टर बी.व्ही.पाटील यांनी केले आहे.
या डाक मेळाव्या दरम्यान टपाल कार्यालयातील विविध योजना,केंद्र शासनाच्या विविध योजना आणि आधार नुतनीकरण अशा सेवा विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन उपलब्ध केल्या जाणार आहेत.या मेळाव्यामध्ये अनेक योजना टपाल कार्यालयातर्फे राबविल्या जाणार आहेत.
मेळाव्यामध्ये पोस्ट विभागाचे नवीन खाते काढणे,10 वर्षाच्या आतील मुलींसाठी सुकन्या समृध्दी योजनेचे खाते काढणे,केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी नवीन डाक विमा काढणे,पोस्ट विभागाचे सर्वदूर पोहचेलेले डिजिटल एल.पी.पी.बी.खाते काढणे आदी सेवांचा समावेश आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,अटल पेंशन योजना तसेच प्राधान मंत्री जीवन ज्योती योजना या सेवाही पुरवण्याचे हे उद्दीष्ट उस्मानाबाद टपाल विभागाने ठरवले आहे.या मेळाव्याची खास बाब म्हणजे आधार कार्डचे नुतनीकरण आणि नवीन आधार कार्ड काढण्यासारख्या सेवा दिल्या जाणार आहेत.