मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुळजापूर शहराजवळ कारवाई करत एका टेम्पोतून वाहतूक होणारा ६२.४ किलो गांजा जप्त करत एकास गजाआड केले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांच्या पथकाने सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तुळजापूर ते नळदुर्ग रोडवर लोकमंगल पेट्रोलपंपाजवळ केली.
तुळजापूर शहर परिसरातून अवैध गांजा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे उपनिरीक्षक पांडुरंग माने यांना मिळाली होती. यावरून त्यांनी पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे एलसीबीचे पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री सापळा रचला. यामध्ये त्यांनी नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, तुळजापूरचे पो.नि. मनोजकुमार राठोड, सपोनि गणपत राठोड, एलसीबीचे कर्मचारी प्रमोद थोरात, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, आरसेवाड, अविनाश मरलापल्ले यांच्यासह हा सापळा रचला.
यावेळी त्यांना लोकमंगल पेट्रोल पंपाच्या दक्षिणेस पाण्याच्या टाकीजवळ एक मिनी ट्रक क्र. केए ३९-८८५९ हा संशयित रीतीने उभारल्याचे आढळले. त्यानुसार सदरील ट्रकची तपासणी केली असता विजयकुमार श्रावण मदनुरे (रा. दागडी, ता. भालकी) याने ३ पोत्यात असलेला प्रत्येकी १० गांजाचे पुडे असा एकूण ६२.४ किलो गांजा लपवून ठेवल्याचे आढळून आले. सदरील गांजा जप्त करत आरोपी मदनुरे यास ताब्यात घेऊन नमूद गांजा व मिनी ट्रक, मोबाईल फोन तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
 
