उस्मानाबाद/ प्रतिनिधी
संत गोरोबा काका यांच्या प्राचीन घराच्या दुरुस्तीच्या कामाची फेर तपासणी करून गुणवत्तेनुसार काम झाले नसल्यास कंत्राटदारावर कारवाई करुन कोसळलेल्या छताची दुरुस्ती करण्याची सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांना केली. तसेच तेरचा एकात्मिक विकास आराखडा बनविण्याच्या अनुषंगाने देखील यावेळी चर्चा झाली.
संत गोरोबाकाका यांचा सहवास लाभलेल्या तेर नगरीस ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहे. येथे अनेक प्राचीन मंदिरे असुन पुरातत्वीय अवशेष सापडलेले आहेत. श्री. संत गोरोबा काकांचे पुरातन घर राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोषीत केले असून या घराच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु, काम निकृष्ठ झाल्यामुळे घराचे छत कोसळल्याने नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी डॉ. तेजस गर्गे यांची भेट घेतली. यावेळी सहाय्यक संचालक अजित खंदारे यांना झालेल्या नुकसानीची पाहणी करुन संबंधीत कंत्राटदाराकडून तातडीने दुरुस्ती करुन घेण्याच्या सुचनाही देण्याचे संचालकांनी आदेशीत केलेे आहे.
यावेळी तेरच्या एकात्मिक विकास आराखड्याबाबतही चर्चा झाली. पुरातत्व विभागाच्या संचालनालयामध्ये त्रिविक्रम मंदिराचा फोटो असून विद्यमान संचालकाना तेरबाबत आस्था आहे. पुरातत्व विभाग व तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या भागाचा बृहत विकास आराखडा बनविण्याचा निर्णय झाला.यासाठी महिनाभरात सल्लागार वास्तू विशारद निवडणे व सहा महिन्यात आराखडा बनविण्याचे ठरले आहे.
