अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती व पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सेवा निवृत्तीनंतर बहुतांश माजी सैनिकांनी शेती व्यवसायाचा पर्याय निवडला. नुकत्याच झालेल्या शेती नुकसानीने हतबल झालेल्या माजी सैनिकांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी माजी सैनिक सहकारी पतसंस्थेकडुन अल्प व्याजदराने कर्ज वितरणाचा शुभारंभ सोमवारी (दि.२) करण्यात आला.
शहरातील माजी सैनिक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी सैनिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष शहाजी चालुक्य यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात अकरा सभासदांना प्रत्येकी पन्नास हजाराचे कर्ज रक्कमेचे धनादेश देण्यात आले. कर्ज वितरणाचे ४५ लाखाचे उद्दिष्ट्य असून एक वर्षाच्या मुदतीत ९ टक्के व्याजदराने कर्ज परतफेड करावी लागणार आहे. दरम्यान माजी सैनिक पतसंस्थेचे ८११ सभासद आहेत, दोन कोटी २७ लाख रूपयाच्या ठेवी पतसंस्थेकडे जमा आहेत, ठेवीवरील मूळ रक्कमेवर दोन टक्के आगाऊ व्याजदराची रक्कम आणि बारा टक्के लाभांशाची रक्कम अशी एकूण २८ लाख ७७ हजाराची रक्कम दिवाळी सŕणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित सभासदाच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. माजी सैनिकांच्या आर्थिक अडचणीसाठी पतसंस्था नेहमी मदत करीत आली आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी माजी सैनिकांना अडचण येऊ नये म्हणून पन्नास हजाराचे कर्ज देण्याचा निर्णय पतसंस्थेने घेतला.
या वेळी पतसंस्थेचे संचालक आदिनाथ घोरपडे, विश्वंभर दासिमे, बालवीर शिंदे, वाल्मिक भोसले, सभासद हरि इंगळे, अशोक सुर्यवंशी, भास्कर बाचणे आदी उपस्थित होते.
 
