उमरगा / प्रतिनिधी
कोरोनाच्या आपत्ती काळात सोई-सुविधांचा अभाव असतानाही एस.टी. कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालुन अत्यावश्यक सेवा देत आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यापासुन वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून थकित वेतन व देय रक्कम देण्याच्या मागणीचे निवेदन कामगार संघटनेच्या वतीने तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले.
कोरोनाच्या काळात एस.टी. महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झालेले असून सुमारे ७४ कर्मचारी मृत झालेले आहेत. कोरोना कालावधीत कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही कामगारांना माहे ऑगष्टपासून वेतन दिलेले नाही, त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस.टी. कर्मचायऱ्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर २०१९ पासुन वाढीव पाच टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. परंतु एस.टी. कामगारांना वाढीव टक्के महागाई भत्ता अद्याप लागू केलेला नाही. त्याच प्रमाणे २०१८ ची वाढीव दोन टक्याची तीन महिन्याची थकबाकी व २०१९ ची तीन टक्क्यांची नऊ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकीही एस.टी.कामगारांना अद्याप मिळालेली नाही, त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये सण उचल लागू केलेली आहे. परंतु एस.टी. कामगारांना ही सवलत लागू नाही.
दिवाळीसारख्या महत्वाचा सण १२ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. सणापुर्वी एस.टी. कामगारांना मागील दोन महिन्यांचे थकीत वेतन, ऑक्टोबर महिन्यापासुनचे वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सण उचल मिळणे आवश्यक आहे. थकित वेतन न मिळाल्यास कामगार नऊ नोव्हेंबरपासून आक्रोश आंदोलन करणार आहेत. निवेदनावर कामगार संघटनेचे अध्यक्ष अर्जुनसिंह गौतम, एस.टी. बँक संचालक जयवंत जाधव, सचिव संजय मनकुरे, दिलीप खंडांगळे, शिवकुमार देशमुख, जयवंत पाटील, कामगार संघटनेचे संघटक महादेव घोगरे, बालाजी काळे, नंदू परांडे आदींच्या सह्या आहेत.
 
