मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे पुन्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यातच भाजपचे खा. छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी चुकीची व दुपट्टी भूमिका घेतल्यामुळे ओबीसी समाजामध्ये ओबीसींचे आरक्षण जाते का राहते ? अशी ओबीसी बांधवांमध्ये भीती निर्माण झाली असल्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाचा बचाव करण्यासाठीच दि. ६ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथून पहिला ओबीसी आरक्षण बचाव ढाल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२ नोव्हेंबर रोजी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजास संविधानिक स्वतंत्र विशेष आरक्षण द्यावे अशी आमची मागणी असून मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मागू नये. मराठा आरक्षणासाठी ओबीसी समाजाने पाठिंबा दिलेला असताना देखील भाजपाचे खा. छत्रपती संभाजीराजे हे राज्यात गोंधळ करीत आहेत. ते चुकीचे असून त्यांनी गोंधळ करण्याऐवजी रास्त भूमिका मांडावी असे आवाहन बारसकर यांनी केले आहे. तर कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षण प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
तशी भूमिका खा. संभाजीराजे यांच्या मताशी भारतीय जनता पक्ष सहमत आहे किंवा नाही ? याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. देशात ५२ टक्के ओबीसी असताना त्यांना ४५ वर्षांनी उशिरा तेही केवळ २७ टक्के आरक्षण दिले गेले आहे. विशेष म्हणजे कोणता कायदा करायचा ? याबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया संसदेच्या ज्या सभागृहात राबविली जाते. त्याच सभागृहात खा. संभाजीराजे बसतात. तेच आज चुकीची व विचित्र मागणी करीत असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.