तालुक्यातील हासेगाव केज येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आपापसात वर्गणी जमा करून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका तयार करून वाटप करण्यात आल्या.
सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून ऑनलाइन शिक्षण चालू आहे परंतु ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. सर्व विद्यार्थी शिक्षण प्रवाहात रहावेत यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी वर्गणी गोळा करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 2 नोव्हेंबर रोजी स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप केले. आजच्या स्वाध्याय पुस्तिका वाटप कार्यक्रमात शाळेतील शिष्यवृत्ती पात्र13 विद्यार्थ्यांचा तसेच याच शाळेत प्राथमिक शिक्षण झालेल्या कुमारी नेहा सुरेश चवरे हिचा नीट प्रवेश परीक्षेत उज्वल यश मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थिनी नेहा चवरे ,कु शिवानी पाटील व शिक्षक अमोल बाभळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर श्री बाळकृष्ण तांबारे व भारती साहेब या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात जे-जे करता येईल ते करण्यास सांगितले, तसेच शाळेच्या प्रगतीचे व विविध उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी श्री भारती साहेब महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष श्री बाळकृष्ण तांबारे, विस्ताराधिकारी सुशील फुलारी, केंद्रप्रमुख मुख्य श्री सोमनाथ चंदनशिव, श्री पांडुरंग गामोड, श्री बब्रुवान पांचाळ ,मुख्याध्यापक देविचंद ताठे व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ गुंजाळ यांनी केले तर प्रशांत घुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी कोकाटे,समाधान भातलवंडे,विकास खारके,कालिंदा समुद्रे,प्रतिभा बिडवे व विद्या मनगिरे यांनी परिश्रम घेतले.
