उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील बहुचर्चित सहा वर्षाच्या कृष्णा गोरोबा इंगोले याचा निघृण खून करून नरबळी दिल्याप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे मयत चिमुकल्याची सख्खी आत्या,   चुलता-चुलती, चुलत आजोबा यांनी पूणे येथील दोन मांत्रिकांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. सदरची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ श्री. एम. जी. देशपांडे यांनी शुक्रवारी दिनांक २३ ऑक्टोबर रोजी ठोठावली.

यासंबंधी अतिरीक्त शासकीय अभियोक्ता अँड. सचिन सूर्यवंशी यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २६. जानेवारी २०१७ रोजी मयत कृष्णा हा शाळेतून झेंडावंदन करून घरी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान आला होता. त्यावेळी त्याची आई घरी नसल्याने घराबाहेर खेळत होता. मात्र त्यानंतर तो अचानक गायब झाला दिवसभर शोधूनही तो मिळून आला नसल्याने शेवटी दि. २६. जानेवारी २०१७ रोजी मयत कृष्णाची आई सारिका इंगोले यांनी तिच्या मुलास अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार दिली होती.  सदर गुन्हयाच्या तपासात दुस-या दिवशी म्हणजे दि. २७ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास शेतामध्ये कृष्णाचा मृतदेह सापडला होता. सदर गुन्हयाचा सुरवातीचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी. डी. बनसोडे यांनी केला. त्यांनतर पुढील सर्व तपास पोलीस निरीक्षक सुनिल नेवसे यांनी केला.

याप्रकरणी केलेल्या तपासात मयत कृष्णाची सख्खी आत्या द्रोपदी पौळ हिने कृष्णाला घरापासून बोलावून घेतल्याचे समोर आले. त्याला आरोपी उत्तम इंगोले याच्या घराच्या मागील सामाईक विहिरीवर दाट झाडीत घेउन गेली. त्याठिकाणी त्याला इतर आरोपींच्या मदतीने दोरीने बांधून दिवसभर ठेवले व मध्यरात्री त्याला तेथील देवासमोर आंघोळ घालून त्याची अघोरी पूजा करून तेथील जमीन गट नंबर २२ मध्ये नेवून कृष्णाला रूमण्याने डोक्यात मारून व दाबण -टोचासारख्या तीक्ष्ण हत्याराने डोळ्याजवळ व नाकाजवळ छिद्र पाडून मयत कृष्णाचे रक्त घेउन ते रक्त आरोपी उत्तम इंगोले याच्या घराशेजारी मयत कडूबाई हिच्या समाधीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात शिंपडले व अशा प्रकारे चिमुकल्याचा नरबळी दिला.

अंधश्रध्देतून दिला नरबळी

आरोपी उत्तम इंगोले याची मयत चुलत बहीण कडूबाई तसेच आरोपी साहेबराव इंगोले याची मयत पत्नी यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचा आत्मा भटकू नये त्यासाठी नरबळी द्यावा लागतो असे कारण निष्पन्न झाले. घटनेपूर्वी आरोपींच्या घरात शांतता नव्हती, आरोपी द्रोपदी पौळ हिच्या दोन मुलीचे पती मयत झाले होते. एका मुलीची मुले जगत नव्हती. या सर्व गोष्टी हया मयत कड़बाईचा व आरोपी साहेबरावच्या पत्नीचा आत्मा भटकत असल्याने हे सर्व होत आहे. त्यासाठी रक्ताच्या नात्यातील लहान मुलाचा नरबळी द्यावा लागेल, असे पुणे येथील मांत्रिक आरोपी राहुल उर्फ लखन चुडावकर व सुवर्णा भाडळे यांनी बाकीच्या आरोपींना सल्ला दिला होता.

घटनेच्या आधीपासून आरोपी उत्तम व त्याची पत्नी उर्मिला हे सर्व कुटूंबासह पुणे येथे वास्तव्यास होते. त्याठिकाणी मांत्रिक आरोपींची ओळख झाली. त्यामुळे हे सर्व आरोपी पिंपळगाव डोळा येथे अमावस्या पौर्णिमेला पूजा करण्यासाठी येत असत.

घटनेच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी पिंपळगाव येथे येउन सर्व आरोपींनी कट कारस्थान करून कृष्णा यांचा नरबळी देण्याची योजना बनविली. त्यासाठी त्यांनी आरोपी उत्तम याच्या घराशेजारी खड्डा खांदून त्याठिकाणी मयत कडूबाईची समाधी बांधण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याप्रमाणे कराड तालुक्यातील मौजे काले येथे जावून आरोपींनी मयत कडूबाईची मुर्ति बनविण्यासाठी ऑर्डर दिलेली होती. सर्व आरोपीतांच्या कटावरून कृष्णा याचा नरबळी देउन त्याचे रक्त खड्डयात शिंपडून त्याठिकाणी मयत कडूबाईची समाधी बांधावयाची होती.

घटनेच्या आठ दिवस आधी आरोपी द्रोपदी हिची मुलगी प्रसूत झाली होती व तिचे बाळ मयत झाले होते. त्या घटनेच्या दिवशी अमावस्या होती, वस्तीवरील लाईटची डीपी जळाल्याने लाईटची व्यवस्था नव्हती, त्यावेळी आरोपी उत्तम इंगोले व ऊर्मिला इंगोले, पुण्याहुन आलेले होते या सर्व गोष्टींचा फायदा घेवून आरोपींनी सदरील कट कारस्थान करून निमुकल्याचा नरबळी दिला.

सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ श्री. एम. जी. देशपांडे यांचे न्यायालयात पूर्ण झाली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकण ३२ साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी वैद्यकीय अधिकारी, आरोपी व मयत यांना मृत्यूपूर्वी एकत्र पाहणारा साक्षीदार, आरोपींच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड व टॉवर लोकेशन, कराड येथील मुर्तिकार, समाधीचे काम घेणारा मिस्त्री व आरोपी लखनचा मित्र यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सदर प्रकरणात पैरवी कर्मचारी म्हणून श्रीकांत माळी कॉन्स्टेबल पोलिस स्टेशन कळंब यांनी काम पाहिले.

या प्रकरणातील काही साक्षीदार फितुर झालेले होते. सदर गुन्हा पाहणारा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासात निष्पन्न झालेला नव्हता. परंतु घटनेच्या आधी व नंतर घडलेल्या छोट्या-छोट्या घटनांचा परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी पूर्ण करण्यास सरकार पक्षास यश आल्याचा अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन एस. सूर्यवंशी यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राहय धरून अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ श्री. एम. जी. देशपांडे, उस्मानाबाद यांनी आरोपी , उत्तम भिवाजी इंगोले, ऊर्मिला उत्तम इंगोले,राहल उर्फ लखन श्रीरंग चडावकर, द्रौपदी उर्फ लक्ष्मी बाबु पौळ, साहेवगत प्रल्हाद इंगोले, सौ.सुवर्णा दिपक भाडळे या सर्व आरोपींना भादवीचे कलम ३०२, ३६३, ३६४, १२०(ब) सह ३८ व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट् व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ चे कलम ३(२) नुसार दोषी धरून कलम ३०२ अन्वये जन्मठेप व रु. ३०००/- प्रत्येकी दंड, कलम ३६३ अन्वये सात वर्ष सक्त मजुरी व रु. २०००/- दंड, कलम ३६४ अन्वये जन्मठेप व रु. ३०००/- दंड, कलम ३(२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ नुसार सात वर्षे सक्त मजुरी व म २००० /- दंड अशी शिक्षा ठोठावली. वरील सर्व शिक्षा एकत्रीत भोगावयाची आहे.


 
Top