उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास व रुग्णांचा मृत्यू दर वाढण्यास जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व यंत्रणा जबाबदार असल्याचा ठपका जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ठेवला असून जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह डजनभर वैद्यकीय अधिकारी व रुग्णालयाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आरोग्य विभागाने न केल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मृत्युदर वाढत आहे असून याबाबत विभागीय आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात दररोज 800 रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या सूचना असतानाही त्याची अंमलबजावणी न करणे , माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची अंमलबजावणी योग्य रित्या न करणे, क्लिनिकल व्यवस्था न करणे यासह अनेक बाबींत आरोग्य विभागाच्या अधिकारी व डॉक्टरांना जबाबदार ठरविले असून 3 दिवसात समक्ष हजर राहून खुलासा करण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी यापूर्वी जिल्ह्यातील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना कोरोना काळात केलेल्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत अशाच प्रकारे नोटिसा काढल्या होत्या त्यानंतर संपूर्ण आरोग्य विभागाच्या प्रमुखांना काढल्याने जिल्हाधिकारी ऍक्शन मोड मध्ये असल्याचे बोलले जात आहे.
उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे,जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय पाटील,उस्मानाबाद तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत ऐवळे, तुळजापूरचे आरोग्य अधिकारी डॉ सुहास पवार,उमरगा येथील डॉ साळुंखे,लोहारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक कठारे,कळंब तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप जाधव,वाशी येथील डॉ गोवर्धन महिंद्रकर, भूम येथील डॉ अमोल शिनगारे,परंडा येथील डॉ सय्यद जहूर या 8 तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ चंचला बोडके, उमरगा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ बडे,कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ जीवन वायदंडे,तेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सचिन कोठावळे,परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अबरार पठाण यांच्यासह भूम ग्रामीण रुग्णालयाचे डॉ जोगदंड, वाशी येथील डॉ शेळके,मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ वसंत बाबरे,लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सूर्यवंशी यांच्यासह सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प संचालक डॉ रमेश जोशी अशा वीस जणांना जिल्हाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. योग्य खुलासा दिल्यास कारवाईचा इशारा सुद्धा या नोटीशीत दिला आहे.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी शासन स्तरावरून तसेच जिल्हाधिकारी स्तरावरून अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना देऊनही ही उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व यंत्रणेने त्या गांभीर्याने घेतल्या नसल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांनी ठेवत, वाढती रुग्ण संख्या व वाढता मृत्यूदर यास या सर्व गोष्टी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम प्रभावीपणे राबविलेली दिसत नाही तसेच कोरोना रुग्णांचे उपचार पद्धतीनुसार वर्गीकरण करणे, प्लस ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करून त्याच्या नोंदी ठेवणे,रेमडीसिव्हीर इंजेक्शन,फॅबी फ्लू गोळ्या,रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा याचे सूक्ष्म नियंत्रण करुन डॉक्टर या नात्याने योग्य असे क्लीनिकल जजमेंट घेऊन त्यानुसार उपचार करण्याच्या सूचना असतानाही त्याची अंमलबजावणी आरोग्य यंत्रणेने योग्य पद्धतीने केलेली नाही असे नोटिशीत नमूद आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत एक हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण व श्वसन संस्थेशी संबंधित आजार असलेले अकराशे पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत यावरून आरोग्य विभागाच्या स्तरावरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी व रुग्णांवरील उपचाराची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नसल्याचे दिसून येत नाही
दर दशलक्ष लोकसंख्येमागे 140 नागरिकांची चाचणी करण्याच्या सूचना असतानाही त्याची अंमलबजावणी उस्मानाबाद जिल्ह्यात होत नसून सर्व तालुक्यात चाचण्यांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. जिल्ह्यामध्ये दररोज किमान 800 रॅपिड अँटीजन 800 व आरटीपीसीआर चाचणी करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. मृत्यूदर किमान 2.5% टक्के पेक्षा कमी आणण्यासाठी अतिआवश्यक सेवा व उपायोजना राबविण्याच्या सूचना असतानाही त्या प्रभावी राबविल्या जात नाहीत. जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करून कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश असताना याबाबत गांभीर्याने व जबाबदारीने अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या सूचनांचे पालन वैद्यकीय अधिकारी व यंत्रणा करीत नसल्याने ही बाब गंभीर असून भारतीय साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम 2020 मधील तरतुदींचा भंग करणारी आहे यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल 20 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. आगामी तीन दिवसात जिल्हाधिकारी यांच्या समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले असून खुलासा सादर न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात 64 हजार 620 नागरिकांचे नमुने तपासले असून त्यातील 13 हजार 109 म्हणजे 20.29 टक्के नमुने पॉझिटिव्ह सापडले आहेत. 13 हजार 109 रुग्णापैकी 417 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्युदर 3.18 टक्के पेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण 82.33 टक्के असून 10 हजार 793 रुग्ण बरे झाले आहेत तर 1 हजार 899 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा विकासाच्या व आधुनिकीकरणाच्या विषयाकडे सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वासह व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे तितकेच दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या अपुऱ्या यंत्रणा,सुविधा व मनुष्यबळावर आरोग्य विभाग व डॉक्टर जीवाची बाजी लावून काम करीत आहेत हे सत्य आहे. अनेक डॉक्टरांना या काळात रुग्णसेवा बजावताना कोरोना संसर्ग झालेला असतानाही त्यांनी बरे होताच तात्काळ रुग्णसेवेचे कार्य सुरू केले. शासकीय यंत्रणा सोबत खासगी डॉक्टर यांनीही कोरोना काळात रुग्णसेवा देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात पर्याप्त सुविधा व यंत्रसामुग्री नसल्याने डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.शहरापेक्षा ग्रामीण भाग व तालुक्यांची स्तिथी तर अत्यंत बिकट आहे. शेजारील इतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सुविधांची तुलना करताना उस्मानाबाद जिल्ह्यातील स्तिथीत सुधारणा व बदल होणे गरजेचे आहे. कोरोना काळात प्रशासकीय स्तरावर अनेक पातळीवर समन्वयाचा अभाव आहे तर काही अधिकारी चालढकल करीत आहेत हेही तितकेच सत्य आहे. उस्मानाबाद कोरोना हा आजार नवीन असल्याने व त्यावर रोज नवनवीन संशोधन आणि निष्कर्ष समोर येत आहेत त्यामुळे कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी तात्काळ डॉक्टर व तज्ञाशी संपर्क साधणे गरजेचे आहे.