उस्मानाबाद जिल्ह्यात ग्राहकांना गेल्या ६ महिन्यात येणाऱ्या वाढीव वीज बिलाविरोधात तसेच वीजबिल माफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. उस्मानाबाद येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी घुसून कार्यालयातील खुर्च्या व इतर साहित्याची तोडफोड करीत वीजबिल कमी करावे अशी घोषणा देत खळ्ळखट्याक आंदोलन केले. हा प्रकार गुरूवारी (दि.८) दुपारी घडला.
यावेळी मनसेच्या २ कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून तोडफोड करीत घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या २ जणांना ताब्यात घेतले. महावितरणचे कर्मचारी मीटर न पाहता भरमसाठ वीजबिल देत असून वाढीव बिलामुळे ग्राहकांना फटका बसत आहे, वाढीव बिल कमी करावे यासाठी मनसे आक्रमक झाली असून याबाबत मनसेने दीड महिन्यापूर्वीच महावितरनला निवेदन दिले होते. परंतु, तरीही कोणीच दखल घेत नसल्याने संतप्त या दोन कार्यकर्त्यांनी आहे. संजय गोकूळ पवार, हितेंद्र रमेश पवार (दोघे रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद) असे सदरील दोन कार्यकर्त्यांचे नाव आहे. यावेळी त्यांनी महावितरण कार्यालयातील ७ प्लास्टीक खुर्च्या व टेबल यांची तोडफोड करून टेबलवरील शासकीय कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली. यावेळी मनसेच्या अवघ्या दोन कार्यकर्त्याच्या आक्रमक भुमिकेपुढे महावितरनच्या अधीक्षक अभियंत्यांसह इतर अधिकारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही केवळ बघ्याची भुमिका घ्यावी लागली. याप्रकरणी श्रीकांत पाटील यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.