उस्मानाबाद  / प्रतिनिधी- 

राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेट घेऊन केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार द्या, वीज बिल, पीक कर्ज माफीसह फळबागांना वेगळे पॅकेज देण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार अमर राजूरकर, सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह काँग्रेस नेते व मराठवाड्यातील आमदार उपस्थित होते. मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सुगीच्या काळात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्यामध्येच सोयाबीन आहे. तर काहींनी सोयाबीनची कापणी केल्यानंतर वावरातच ठेवले असल्यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओढा, नदी काठच्या अनेक गावातील सोयाबीन वाहन गेले आहे.

शेतातील, ऊस, बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, सुर्यफुल, कांदे, तसेच फळभाज्यांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वीज पडल्यामुळे त्यांना पशुधनास मुकावे लागले आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे. या पावसामुळे रस्ते, रस्त्यावरील प्ल, उखडले असून दळणवळणाला अडचण येत आहे. बहुतांश तालुक्यामध्ये पाझर तलाव, सिमेंट बंधारे वाहून गेले आहेत. नॅशनल हायवे नजीकच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे.

मोठ्या प्रमाणात पाणी शेतात जावून शेतीमाल, शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टी भागातील सर्व जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन लगोलग आर्थिक मदत करावी. अतिवृष्टिमुळे पडझड झालेल्या घरांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.


 
Top