तुळजापूर / प्रतिनिधी

 तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवानिमित्त संपूर्ण तुळजाभवानी मंदिर स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र महोत्सवात गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक धार्मिक विधीला आवश्यक तेवढ्याच महंत, पुजारी आणि सेवेकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार असल्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले.

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील तुळजाभवानी मंदिरात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी नवरात्र महोत्सवाची तयारी व नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे आदींची उपस्थिती होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा नवरात्र महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. तरी तुळजाभवानी मातेचे सर्व धार्मिक विधी परंपरागत रितीने पार पाडण्यात येणार आहेत. यासाठी मोजकेच महंत, पुजारी आणि सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले. मंदिरात प्रवेश करण्याच्या एक दिवसापूर्वी संबंधितांची मंदिर संस्थानच्या वतीने अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याचेही तहसीलदार तांदळे यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे प्रशासनाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे.

अॅन्टीजेन टेस्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महसूल आणि आरोग्य विभागाच्या वतीने आगामी २ दिवसांत मंदिर परिसरातील व्यावसायिकांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तांदळे यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क बांधणे आदीसह आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहे.


 
Top