राष्ट्रीय स्तरावर व्यापार आणि उद्योजकांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सचिव यांच्या सूचनेनुसार राज्य सचिवांनी उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी मंत्री यांच्यावर सोपविली आहे.
नागपूर येथील ‘कैट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि दिल्ली येथील सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्याचे सचिव महेश बखाई यांनी संजय मंत्री यांची नियुक्ती जाहीर केली आहे. राष्ट्रीय संघटनेने जिल्हाध्यक्षपद बहाल करून दाखविलेल्या विश्वासाबद्दल संजय मंत्री यांनी आभार व्यक्त केले आहेत. जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्तीचे संपूर्ण अधिकार मंत्री यांना देण्यात आले असून लवकरच जिल्हा कार्यकारिणी गठीत करणार असल्याचे मंत्री यांनी सांगितले.
व्यापार व उद्योजकांसाठी सातत्याने कार्यरत असणार्या संजय मंत्री यांना हे पद मिळाल्याने जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव, उपाध्यक्ष संजय मोदाणी, सिद्रामप्पा चिंचोळे (उमरगा), नंदकिशोर मोरे (कळंब), दिलीप गाढवे (भूम), वाजीद दखणी (परंडा), अॅड. प्रवीण पवार (वाशी), धनंजय जेवळीकर यांनी निवडीचे स्वागत केले आहे. तर जिल्हा व परिसरातील विविध क्षेत्रातून मंत्री यांचे अभिनंदन होत आहे.