बियाणे कंपन्यांनी पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यास व उपलब्ध करून देण्यास साफ नकार दिल्यामुळे बियाणांची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादन केलेले म्हणजे चालू हंगामातील सोयाबीनमधूनच चांगल्या, दर्जेदार व उत्तम प्रतीचे बियाणे व्यवस्थित कशा पद्धतीने घरच्या घरी तयार करावे ? याबाबत
सध्या सोयाबीन पिकांची काढणी व मळणी सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांना बियाणे तयार करण्यासाठी लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग व तंत्र अधिकारी राहुल गायकवाड यांनी मोहीम सुरू केली असून शेतकरी बांधवाकडून या मोहिमेचे स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.
लोहारा तालुक्यातील आर्णी, कानेगाव व कास्ती (बु) आदी गावच्या शिवारामध्ये प्रक्षेत्रावर जाऊन सोयाबीन ग्राम बीजोत्पादनच्या कामाची पाहणी केली. साधारणपणे ७० टक्क्यांपेक्षा कमी आद्रता असताना व पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सोयाबीन बियाणे पूर्ण परिपक्व झाल्यावर कापणी करावी. तर मळणी करतेवेळी अभियानामध्ये १३ ते १४ टक्क्यापेक्षा अधिक आद्रता असू नये. तसेच मळणी यंत्राचे फेरे ३५० ते ४५० पेक्षा जास्त असू नयेत. विशेष म्हणजे मळणी करताना बियाण्याला जास्त इजा पोहोचणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत व ३ ते ४ दिवस उन्हामध्ये हलक्या थरावर पसरून वाळवून चाळणीद्वारे काडीकचरा व माती बाजूला करावी. वाळून स्वच्छ केलेले बियाणे ज्युटच्या बारदान्यामध्ये भरून ७ पोत्यापर्यंतच थप्पी लावून ठेवावी. तसेच थप्पी मारायच्या ठिकाणी दमट व ओलसर जागा नसावी. शक्यतो लाकडी फळ्यांवर थप्पी मारणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी स्वतःकडील पेरणी योग्य सोयाबीनची ३ वेळा उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करणे गरजेचे असते. त्यासाठी पहिली डिसेंबर-जानेवारीमध्ये, दुसरी मार्च-एप्रिलमध्ये व तिसरी मे-जूनमध्ये पेरणी या पद्धतीचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होतो. त्याबरोबरच सोयाबीन बियाणांची उगवणशक्ती ७० टक्क्यापर्यंत असल्यास बियाणी योग्य आहे असे समजावे व या पद्धतीचाच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करून सोयाबीनचे बियाणे स्वतः घरीच तयार करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बिडबाग यांनी केले आहे.