उस्मानाबाद / प्रतिनिधी-
रेमेडिसीवर आणि टॉसिलीझुलाब या औषधाचा तुटव़डा सध्या जाणवत असून कोरोनासाठी या औषधाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये या औषधांचा पुरेसा साठा नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशावेळी खाजगी ठिकाणाहून उसणवारी करण्याची वेळ सुध्दा रुग्णालयावर येत असल्याचे चित्र आहे. अशी माहिती विश्‍वसनिय सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे याबाबत नोडल ऑफिसर डॉ.सचिन बोडके यांना अधिक माहिती विचारली असता पुरेसा साठा असून वाढीव औषधांची मागणी राज्य सरकारकडे नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.
उस्मानाबादेत कोरोनाची सध्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. जिल्हयातील एकुण रूग्ण संख्या ६ हजार ९८३ आहे. त्यापैकी बरे होऊन ४ हजार ४२० रूग्ण घरे गेले आहेत. तर जिल्हयात सध्या २ हजार ३५४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी उस्मानाबाद शासकीय रूग्णालयात ११५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे  मृत्यू झालेल्याची संख्या २०९ झाल्याने  मृत्युदर हा तीन टक्क्यावर गेला आहे. सध्या अँटिजेन टेस्ट कीट देखील संपल्याने अशी स्थिती उद्भवणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे आता गरजेचे बनलेले आहे.
कोरोना रुग्णांना रेमेडिसीवर आणि टॉसिलीझुलाब या औषधींचा (गोळ्यांचा) डोस दिला जात असल्याने साहजिकच त्याचा साठा अधिक असणे आवश्यक आहे. किंबहुना ते संपण्याच्या अगोदर त्याची मागणी करुन त्याचा अधिकचा साठा देखील उपलब्ध करुन ठेवणे गरजेचे बनत चालले आहे. राज्यामध्येच त्याचा साठा मुबलक प्रमाणात नसल्याची तक्रार आहे. अँटिजेन टेस्टमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या अत्यंत कमी वेळात तपासता येत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळत असल्यानेही धोका मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. पण टेस्टची संख्या पाहता आणि औषधींचा तुटवडा जाणवत असल्याचे विदारक चित्र सध्या जिल्हयात आहे.
पुरेसा साठा 
नोडल ऑिफसर डा. सचिन बोडके यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात ११५ रूग्ण असून त्यापैकी १० गंभीर तर ४२ ऑक्सीजन वर आहेत. सध्या रूग्णालयात १०० रेमेडिसीवर इंजेक्शन असून गंभीर रूग्णांनासाठी ते पुरेसे आहे. तर टॉसिलीझुलाब या औषधांच्या गोळ्या तीन हजार आहेत. पहिल्या दिवशी रूग्णांना १८ गोळ्या द्यावा लागतात तर दुसऱ्या दिवसापासून ८ गोळ्या द्याव्या लागतात. त्यामुळे तो साठा ही पुरेसा आहे, असे सांगितले.

 
Top