बेंबळी : लोकसहभाग व विविध संस्थांच्या मदतीने करण्यात आलेल्या सावळा नदी खोलीकरण-रूंदीकरण कामाची जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामसेवा परिवारातील सदस्य उपस्थित होते.

-----‐------‐--------------‐---------------------‐----‐----
गोविंद पाटील / प्रतिनिधी -
कोल्हापुरी बंधार्‍यांचे दरवाजे चोरीला गेल्यामुळे तसेच बंधारे नादुरूस्त झाल्याने दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे बंधार्‍यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून पाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषद सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी दिली.
तालुक्यातील बेंबळी येथे विविध संस्था आणि लोकसहभागातून करण्यात आलेल्या सावळा नदीखोलीकरण व रूंदीकरण कामाची जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी पाहणी केली. विविध क्षेत्रात कार्यरत युवक, औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठाण, सकाळ फौंडेशन आणि जिल्हा प्रशासन आणि नदीलगतच्या शेतकर्‍यांच्या सहकार्यातून साडेचार किलोमीटर लांबीपर्यंत सावळा नदीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले. या कामाची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे यांनी करून कामाचे कौतुक केले. यावेळी बेंबळी शिवारातील जमिनीतील पाणीपातळी वाढण्यासाठी ग्रामसेवा ग्रुपच्या सदस्यांनी सावळा नदीतील सर्व बंधार्‍यांच्या दुरूस्तीचे काम करून पाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून काम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कांबळे यांनी बंधार्‍यांचे जमिनीपासून दोन फूट किंवा आवश्यकतेनुसार उंची वाढवून पाणी अडविण्यासाठी दुरूस्ती करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी ग्रामसेवा ग्रुपचे सदस्य चंद्रकांत खापरे, रणजित बरडे, सचिन मोटे, चंदन भडंगे, डॉ. अमोल गावडे, सचिन व्हनसनाळे, प्रा. धनंजय भोसले, रामभाऊ मोटे, सुधाकर भोजने, अ‍ॅड. अमोल गाडे, नितीन खापरे, शाहनवाज शेख व अन्य सदस्य उपस्थित होते.

 
Top