उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार आहेत. गेली ६ वर्षे आपण उद्योग मंत्री आहात.त्यामुळे आपण सुभाष देसाई शिवसेना मंत्री, राज्याचे उद्योग मंत्री म्हणून पुढाकार घ्यावा व उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, गेली ६ वर्षे उद्योग खाते आपल्याकडे आहे. जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेला भरभरून साथ दिलेली आहे. आता तर मा.मुख्यमंत्रीच शिवसेनेचे आहेत. तरी देखील उस्मानाबाद जिल्ह्यात १०,००० हुन अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य असलेल्या कौडगाव या मराठवाड्यातील २ नंबरच्या सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्राच्या (२५०० एकर) विकासाच्या महत्वपूर्ण विषयाबाबत आपले अक्षम्य दुर्लक्ष का आहे ?  असा सवाल भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित करून  विविध विकासाबाबतचे प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे जिल्हयातील राजकारणात परत एकदा भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील विरूध्द शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातले वाक् युध्द पेटले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात शेती हेच जनतेच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे धारण क्षमता कमी होत असल्याने शेतीत देखील रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. परिणामी युवकांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागते व हजारो युवक आपल्या हाताला काम मिळत नसल्याने नैराश्याकडे झुकत आहेत. त्यामुळे येथील तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी औद्योगिकरण वाढीला लागणे अत्यंत गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात औद्योगिकरणाला चालना मिळावी, कौडगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी धोरण आखावे, सौर प्रकल्प, टेक्निकल टेक्सटाईल पार्क आदी मुद्द्यांबाबत सातत्याने विधिमंडळ, पत्र, प्रत्यक्ष भेटून व आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत. नवीन सरकार स्थापन झाल्यावर देखील २ वेळा पत्र लिहले मात्र अजून त्यावर कसलीही कार्यवाही होत नाही, याबद्दल खेद वाटतो.
तांत्रिक वस्त्र निर्मितीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला संधी असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे व उद्योग मंत्री म्हणून आपाल्याकडे उस्मानाबाद येथे “Technical Textile Hub” उभारण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत देवेंद्रजी ह्यांनी १ सप्टेंबर २०१९ रोजी उस्मानाबाद येथे “Technical Textile Hub” उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन यांनी याबाबत के.पी.एम.जी. या जगविख्यात तांत्रिक सल्लागार कंपनीकडून प्राथमिक अहवाल तयार केलेला आहे. तरी देखील याबाबत काहीच हालचाल होत नाही हे अनाकलनीय आहे. याबाबत आमदार राणा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अशातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रासाठी अधिगृहीत केलेल्या भूखंडाचे सेवा शुल्क रद्द करण्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला व सदर विषय बोर्ड मिटिंग मध्ये ठेवण्यास सांगितल्याबद्दल त्यांनी आपले आभार मानले असून हा विषय जरी महत्वाचा असला तरी त्यापेक्षा अधिक महत्वाचा विषय हा कौडगाव या मराठवाड्यातील २ नंबरच्या सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्राचा (२५०० एकर) विकास हा आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार आहेत. गेली ६ वर्षे आपण उद्योग मंत्री आहात.त्यामुळे आपण शिवसेनेचे मंत्री, राज्याचे उद्योग मंत्री म्हणून पुढाकार घ्यावा व उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, इथल्या तरुणांच्या हाताला काम देऊन अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी व्यक्तिशः लक्ष द्यावे. तसेच कौडगाव, उस्मानाबाद येथील औद्योगिक वसाहतीत “Technical Textile Hub” उभारणीच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन केंद्र शासनाकडे पाठवावे. कौडगाव औद्योगिक वसाहतीत सोलर व इलेक्ट्रॉनिक्स पार्टसच्या निर्मितीचे पार्क स्थापन करावे. कौडगाव येथे २५० मेगा वॅट क्षमतेचा हायब्रीड सौर प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची व्हर्चुअल बैठक आयोजित करुन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार राणा पाटील यांनी केली आहे. 
 
Top