उस्मानाबाद / प्रतिनिधी-
भूम तालुक्यातील गाजलेल्या अमोल टकले खून खटल्यातील तीन आरोपींना भूम सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.अमोल टकले हा जय हनुमान संघटनेचा कार्यकर्ता होता. याप्रकरणात भूम नगर पालिकेचे गटनेते तथा भाजप नेते संजय गाढवे यांच्यासह ७ जणांची निर्दोष सुटका झाली आहे. या खटल्याचा निकाल मंगळवारी भूम सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. उत्पात यांनी दिला.
१६ सप्टेंबर २०१४ रोजी भूम तालुक्यातील सावरगाव येथे जुन्या वादातून हाणामारी झाली होती.या घटनेत टकले (३२) यांचा तलवारीने खून करण्यात आला.परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एच.बी. वाकडे यांनी करुन आरोपी मंगेश मल्लीकार्जुन बोराडे उर्फ बाळु (३८), नवनाथ बळीराम बोराडे (२७), समाधान अंबऋषी बोराडे (३३, तिघे रा. सावरगांव) यांच्यासह संजय गाढवे व १० आरोपींविरुध्द भूम सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. भूम सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री.उत्पात यांच्यासमोर सुनावणी झाली. यात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट के.डी. कोळपे यांनी बाजु मांडली. या खटल्याचा निकाल मंगळवारी जाहीर होऊन न्यायालयाने उपरोक्त तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व १० हजारांचा दंड सुनावला.