उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथे ग्रामपंचायतच्या विविध कामांमध्ये अपहार करणाऱ्यांना चौकशी न करता पाठीशी घालणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर पाटील यांनी केली आहे. तसेच. यासंदर्भातील मागणीचा विचार न झाल्यास 2 ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर महात्मा गांधीजी जयंतीदिनी प्राणांतिक आमरण उपोषण करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. 
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, दि. 17 फेब्रुवारी व 12 मार्च रोजी, 2019 व 2020 च्या आर्थिक वर्षातील 14 वा. वित्त आयोग व दलित सुधार योजनेअंतर्गत कामात झालेल्या अपहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भातील तक्रार अर्ज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी पंचायत समिती विस्ताराधिकारी बी. एन. देशमुख यांची 26 फेब्रुवारी रोजी व 30 जुलै रोजी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. परंतु, सदरील प्रकरणात कुठल्याही प्रकारची चौकशी न करता भ्रष्ट प्रशासनाला पाठीशी घालण्याचे काम देशमुख यांनी केली आहे. यामुळे देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच बेंबळी येथे झालेल्या कामाची राज्य गुणवत्ता परीक्षण आयोगाच्या मार्फत चौकशी करण्यात यावी असेही निवेदनात नमूद आहे. यासंदर्भातील मागणीचा विचार न झाल्यास 2 ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर महात्मा गांधीजी जयंतीदिनी प्राणांतिक आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
Top