जिल्हा रुग्णालयात क्रॉम्प्टन ग्रीव्हज व तेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व बंगलोर येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित विशेषज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून क्लाऊड फिजिशियन टेलिमेडीसिनचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये बंगलुरूमधील पथकाव्दारे अतिदक्षता विभागात टेली आयसीयू व्यवस्थेद्वारे उपचारासाठी मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. वाढता मृत्युदर कमी करण्यासाठी हा विधायक पुढाकार घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात तज्ञ डाॅक्टरांअभावी अतिदक्षता विभागातील अत्यवस्थ रुग्णांना उपचार घेण्यास प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. पी.एम. केयर्सच्या माध्यमातून ८० व्हेंटिलेटर उपलब्ध केले असले तरी त्यासाठी आवश्यक तज्ञ नसल्याने ते वापराअभावी पडून आहेत. या अडचणी लक्षात घेता तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये क्लाऊड फिजिशियन हा उपक्रम राबविण्यासाठी सुरूवातीपासून प्रयत्न सुरू होते. परंतु, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला येत असलेल्या अडचणी लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून “क्लाऊड फिजिशियन’ उपक्रम सुरू करणे सर्वात योग्य पर्याय असल्याने याबाबत आमदार पाटील यांनी यानुशंगाने प्रयत्न केले. शनिवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील, महात्मा फुले योजनेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे , क्लाऊड फिजिशियनचे डॉ. ध्रुव जोशी व डॉ. रमण आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे वरिष्ठ प्रबंधक यांच्यात व्हर्चुअल मिटिंगमध्ये निर्णय होऊन सोमवारी जिल्हा प्रशासनामार्फत उपक्रमाबाबत व्हर्चुअल बैठकही पार पडली.