तुळजापूर / प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी देवीच्या खजाना व जमादार खान्यातील अतिप्राचीन व ऐतिहासिक पुरातन दागिन्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी देवस्थानचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदासराव नाईकवाडी यांच्यावर गुन्हा नोंद करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तहसीलदार तथा मंदिर देवस्थान समितीचे व्यवस्थापक यांना दि.१० रोजी दिले आहेत.
तुळजाभवानी देवीच्या जमादार खान्यातील तसेच खजान्यातील अनेक मौल्यवान, अतिप्राचीन दागिने, चांदीच्या वस्तू, पुरातन नाणी गायब आहेत. हा प्रकार तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी नूतन व्यवस्थापकांकडे पदभार दिल्यानंतर उघडकीस आला होता. याप्रकरणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी केली असता नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात गुन्हा अथवा कारवाई होत नव्हती. केवळ एकमेकांकडे पत्र पाठवून कागदे फिरत होती. परंतु, दि.१० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी या प्रकरणी नाईकवाडी यांच्यावर तत्काळ तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
इतर अधिकारी दोषमुक्त
या प्रकरणात गंगणे यांनी नाईकवाडी यांच्याबरोबरच या पदभार देवाण-घेवाणीतील इतर अधिकाऱ्यांवरही आरोप करत त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली होती. परंतु, या प्रकरणात नाईकवाडी वगळता इतर अधिकाऱ्यांचा बेकायदेशीर हेतू अथवा फौजदारी प्रमाद दिसून येत नसल्याचे नमूद करत केवळ नाईकवाडींवर ठपका ठेवण्यात आला आहे.
 
Top