गोविंद पाटील / प्रतिनिधी
शेतकरी आणि निसर्गाचे संकट‌ हे समीकरण इतके घट्ट बनले आहे की, पाऊस कमी पडला तरी त्याची झळ शेतातील पिकांनाच व जास्त झाला तरी देखील नुकसानिचा फटका शेतकऱ्यांनाच‌बसतो. यंदा देखील ‌काही ठिकाणी सोयाबीन काढणीस आले असतानाच पावसाने बेसुमारपणे बरसण्यास सुरुवात केली आहे. या पावसाने शेतकऱ्यांचा ऊस आडवा केल्याने शेतक-यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. 
तसेच हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. जर पावसाचा‌ असाच धुमाकूळ सुरु राहीला तर उभे पीक पाण्यतच कुजुण सडण्याचा धोका वाढला आहे. गतवर्षी देखील ऐन सोयाबीनसह  इतर पीके काढणीस आलेली असतानाच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे सर्व पिकात पाणी साचल्यामुळे ती नासून सडली तर जे सोयाबीनचे काड गोळा करून एकत्र ठेवले होते त्यास कोंब फुटून ते उगवून त्याची जाग्यावरच माती झाली होती. यंदा देखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटूंबाचे धाबे दणाणले आहेत. कारण या पिकावरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा गाडा अवलंबून असतो व या पिकावरच त्याचे सर्व स्वप्न रंगवलेले असते. मात्र हे स्वप्न साचलेल्या पाण्यात पिकांबरोबरच सडून जाऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. कारण या ‌संकटापासून शेतकऱ्यांची कोण व कशी सुटका करणारा ? हा एक अनुत्तरित प्रश्न सर्वांनाच सतावू लागला आहे.
 
Top